वसंतदादांचं विधान शिवसेनेसाठी टर्निंग पॉइंट ठरलं  | पुढारी

वसंतदादांचं विधान शिवसेनेसाठी टर्निंग पॉइंट ठरलं 

संतोष कणमुसे; पुढारी ऑनलाईन डेस्क 

मुंबई आणि शिवसेनेचं जिवापाड नातं आहे. इथल्या महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे.

मराठी माणसासाठी मुंबईत शिवसेनाच पाहिजे असा एक मतप्रवाह मुंबईमध्ये पसरलेला दिसतो. पण एक काळ होता जेव्हा याच मुंबईत शिवसेनेचा मासबेस हलला होता. लोकसभा, विधानसभा असो अगदी महानगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील सेनेची पिछेहाट चालली होती. पक्षाचं भवितव्य अंधारात वाटत होतं. अचानक एक घटना घडली आणि शिवसेनेसाठी तो मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

काय घडलं होतं नेमकं, चला तर जाणून घेऊ…

मुंबईत मराठी माणसांना नोकऱ्यांवरुन काढून टाकल जायचं. याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होती. तत्कालीन सरकारने पोलिस बळाचा वापर संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर केला होता. मराठी माणूस पेटून उठला होता. या काळात मराठी माणसांची बाजू घेणारं एक साप्ताहिक जन्माला आल. त्याच नाव ‘मार्मिक’.  

वर्ष १९६०

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी व्यंगचित्रासाठी एक साप्ताहिक काढण्याच ठरवलं. पुढ त्या साप्ताहिकाला नाव काय द्यायचा विचार सुरु झाला. अनेक नाव पुढ येत होती. यात प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘मार्मिक’ हे नाव देण्याच सुचवल आणि मार्मिक नावाच साप्ताहिक काढायचं ठरलं.  

सन १९६० ला ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा जन्म झाला. ‘मार्मिक’ साप्ताहिक मराठी माणसांच्या हक्कासाठी लढू लागलं. मराठी माणसांना नोकऱ्या तसेच दक्षिण भारतीयांच्या विरोधात सूर या अनेक विषयांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकाने मराठी माणसांची मन जिंकली. हीच बीज ‘शिवसेने’च्या स्थापनेची होती. एका व्यंगचित्र साप्ताहिकाने आणि व्यंगचित्रकाराने कलेच्या ताकदीवर राजकीय पक्षाला जन्माला घातल्याचं इतिहासातील एकमेव उदाहरण.  

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ‘मार्मिक’ या साप्ताहिकानंतर एक संघटना काढण्याचा निर्णय घेतला. त्या संघटनेला नाव काय द्यायच ठरलं नव्हतं. १९ जून १९६६ रोजी कदम मेंशनमधील प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात १९ लोक जमले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याच्या साक्षीने शिवसेनेचा जन्म झाला.

मराठी माणसांचा मुद्दा, संयुक्त महाराष्ट्र, स्थानिकांना नोकऱ्या, या मुद्द्यांनी शिवसेनेनं मुंबईतील लोकांच्या मनात स्थान निर्माण केल होतं. कोणत्याही मुद्दयावर शिवसेना रस्त्यावर उतरुन न्याय मिळवून देत होती. शिवसेनेनं ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण याच्यावर असल्याचं जाहीर केलं होतं. पुढं १९६७ मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं राजकारणात प्रवेश केला. प्रजासमाजवादी, रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस पक्षाचे विविध गट यांच्यासोबत काही निवडणुकांत युती केली होती. 

पुढे वर्ष १९६९ मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसेनेनं मुंबईतील माहीम कॉजवे येथे अडवण्याचा प्रयत्न झाला आणि दंगल उसळली. या दंगलीच्या निमित्ताने शिवसेनेचं वेगळ रुप महाराष्ट्राने बघितल होतं. समाजकारणात तसेच राजकारणात शिवसेनेची १९६६ पासून घौडदौड सुरुच होती. पण पुढे एका घटनेमुळे शिवसेना पुन्हा बॅकफुटवर आली. 

वर्ष १९७५

देशात आणीबाणीचा काळ सुरु होता. देशातील राजकारणात मोठी घडामोड सुरु होती. वर्ष १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणाबाणी लागू केली होती. देशभरातून त्यांना विरोध दर्शवला जात होता. यात शिवसेनेनं आणीबीणीला पाठिंबा दर्शवला होता. हाच पाठिंबा शिवसेनेला राजकीयदृष्ट्या महागात पडला होता. या घटनेनंतर शिवसेना बॅकफूटवर आली होती. पुढे झालेल्या निवडणुकांत पक्षाला यश मिळत नव्हतं.  

पुढ काही दिवसांतच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार होती. त्यामुळे शिवसेनेला प्रश्न पडलेला निवडणूक कशी लढवायची. काँग्रेसने कायदा करुन मुंबई महानगर पालिकेवर प्रशासक नेमण्याचा अधिकार स्वत:कडे घेतला होता. त्यानंतर १ मे १९८४ पासून महापालिकेवर तत्कालिन महानगरपालिका आयुक्त द.म.सुखटणकर यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले. 

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर प्रशासक नेमल्याने देशातील वर्तमानपत्रात चांगलीच चर्चा झाली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करुन केंद्रशासित प्रदेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. 

विधानपरिषदेमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद नवलकर यांनी मुंबईपासून महाराष्ट्र वेगळ करुन केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा केंद्राचा विचार असल्याचा विषय काढला.

या विषयावर बोलताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले, मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचा विचार कोणी करत असतील अशी शक्यता आहे पण, आपण सर्वांनी दक्ष राहून अशा प्रयत्नांना विरोध केला पाहिजे. 

मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याच्या अफवा जरी असल्या तरी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना एकप्रकारे पुष्टी मिळाली आणि राज्यात खळबळ उडाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी महाराष्ट्राने १०६ हुतात्मे दिले होते. त्यामुळे त्यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या विचारानेही मराठी माणस पेटून उठत होती. 

पुढ एप्रिल १९८५ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार होत्या. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विधानामुळे शिवसेनेला आयते कोलीत मिळाले होते. ‘’मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव’’ या विषयावर शिवसेनेन ही निवडणूक लढवली आणि जिंकली. शिवसेनेच्या राजकारणातील प्रवेशानंतर सतत राजकीय धक्के खाल्ल्यानंतर मुंबईतील या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली होती. 

या विजयानंतर शिवसेनेन पाठिमागे वळून पाहिलच नाही. शिवसेनेनं नंतरच्या काळात घेतलेल्या राजकीय उभारणीच व महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच श्रेय सुध्दा याच विजयाला जातं. १९८५ हे वर्ष सेनेसाठी टर्निंग पॉइंट ठरला. मुंबई महापालिकेतील निवडणुकीच्या या विजयानंतर शिवसेनेन पाठिमागे वळून पाहिलच नाही. पुढे विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळाले. एका साप्ताहिकाने जन्म दिलेल्या पक्षाने राज्यात मोठी झेप घेतली.

संदर्भ- बाळासाहेब आणि शिवसेनेचा प्रवास-धवल कुलकर्णी

वाचा :अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ फिल्म १० KGF फिल्मच्या बरोबरीची; बुची बाबुंचा दावा 

वाचा :द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेत बदल!

Back to top button