आमदार प्रताप सरनाईक गायब, भाजपची तक्रार  | पुढारी

आमदार प्रताप सरनाईक गायब, भाजपची तक्रार 

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार शनिवारी भारतीय जनता पक्षाने स्थानिक मतदार यांच्यासोबतीने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन केली. दरम्यान, यावेळी भाजप आमदार, माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी ‘आमदार झाले मि. इंडिया’ असे बॅनर हाती घेऊन ‘मि. इंडिया’ आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी केली. तसेच याप्रसंगी आमदार सरनाईक हे मातोश्रीवर असल्याचा आरोपही भाजपने केला.

वाचा : देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल; संजय राऊतांचा सूचक इशारा

स्थानिक मतदार मिलिंद नईबागकर आणि हरीष जोशी यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मात्र ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची मदत करताना दिसत नाहीत. जवळजवळ १०० दिवस झाले आहे. ते गायब होवून ते कुठे हरवले आहेत, असा संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का? या सर्व बाबींचा तपास करून आमदार सरनाईक यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्या लेखी तक्रारीत केली आहे. यावेळी ठाणे जिल्हा प्रभारी खासदार किरीट सोमय्या, जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्यासह सीताराम राणे व आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी मिस्टर इंडिया झालेल्या आमदारांना शोध देण्याची मागणी केली. तसेच ‘आमदार झाले मि. इंडिया असे बॅनर हाती घेतले होते.

यावेळी, प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार सरनाईक हे मातोश्रीवरच असल्याचा धक्कादायक आरोप केला. ते मातोश्रीवर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची मातोश्रीवर चौकशी करा, यासाठी आम्ही वर्तकनगर पोलिस ठाण्यात आलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा : मुंबईत ९ ठिकाणी केले बोगस लसीकरण

Back to top button