भाजपतर्फे उद्यापासून ठाण्यात `जन की बात’ | पुढारी

भाजपतर्फे उद्यापासून ठाण्यात `जन की बात'

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहरातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर आणि आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागात दर रविवारी `जन की बात, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या रविवारी २७ जून रोजी कोपरीत सकाळी १० वाजता पहिल्या कार्यक्रमाने उपक्रमाला सुरूवात होणार आहे.

अधिक वाचा : ठाण्यात ओबीसींचे आक्रोश आंदोलन

कोरोना आपत्तीच्या काळातील निर्बंधांमुळे सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा होती. त्यातच बहुतांशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कोविड उपाययोजनांच्या कामासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांच्या काळात जनसामान्यांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून पोकळ आश्वासने व होणारी टोलवाटोलवी आणि महापालिकेतील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराच्या मालिकेमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

अधिक वाचा : नोरा फतेही गायकाने ‘प्रपोज’ केल्याने भडकली!

या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात प्रत्येक भागातील नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपातर्फे `जन की बात, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण शहराच्या विविध भागात दर रविवारी हा कार्यक्रम होईल. त्यात खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह भाजपाचे स्थानिक नगरसेवक, मंडल अध्यक्ष तसेच  पदाधिकारी उपस्थिती राहणार आहे.

अधिक वाचा : ८५ देशात कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’चं थैमान

ठाणे शहरातील पहिला `जन की बात’ कार्यक्रम येत्या रविवारी २७ जून रोजी सकाळी 11 वाजता ठाणे पूर्व येथील आनंद टॉकिज येथील बॅंक्वेट हॉलमध्ये, तर दुसरा कार्यक्रम ४ जुलै रोजी कळवा येथे होईल. या कार्यक्रमात स्थानिक प्रश्नांबरोबरच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे, टपाल विभागातील समस्यांविषयी नागरिकांना दाद मागता येतील, असे भाजपाने म्हटले आहे.

Back to top button