‘राजर्षी’ साकारणारा ‘दीपक’ शाहू जयंतीलाच गेला | पुढारी

‘राजर्षी’ साकारणारा 'दीपक' शाहू जयंतीलाच गेला

उमेश सूर्यवंशी

‘राजर्षी ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक करण्याची जबाबदारी ‘त्या’ युवकावर होती.  तो युवक ‘लोकराजा फोरम’ या संघटनेचा अध्यक्ष होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मी लिहिलेल्या आणि लोकराजा फोरमने साकारलेल्या राजर्षी पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. यावेळी आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते.  काही वेळाने फोरमचा अध्यक्ष म्हणून ‘तो’ तरुण माईकसमोर आला. आणि म्हणाला, ‘पवारसाहेब , मला काय हे बोलाय बिलाय जमत नाही . काम कायभी सांगा करतो, पण बोलाय जमत नाही.’ त्याच्या या जबरदस्त प्राजंळपणावर खुद्द पवारसाहेबांना हसू आवरले नाही आणि संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृह हास्यरंगात रंगले. ‘तो’ शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसला. ‘तो’ प्राजंळ मनाचा तरुण म्हणजे आमचा जवळचा मित्र आणि चळवळीचा साथी दीपक दळवी. 

वाचा : राजगडावर रोप वे, कुणासाठी व कशासाठी?

प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे हा आमचा रांगडा कोल्हापूरकर गडी काल (ता. २६ जून) शा!हू जयंती दिवशी अचानक आमच्यातून निघून गेला. कोरोनाने घेतलेला हा आणखी एक जीव. ‘दीपक गेला..’हे फोनवर जेव्हा ऐकले तेव्हा क्षणभर कानांत धरणीकंप झाला. शाहू जयंतीचे व्याख्यान देऊन मी गाडी सुरू करणार इतक्यात मित्र सागर यांचा फोन आला आणि ही दुःखद बातमी कानावर पडली. दीपक काही साधासुधा मनुष्य नव्हता. डोक्यात प्रचंड कल्पना घेऊन वावरणारा हा गडी. या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी नेहमीच धडपडणारा हा जीव.

वाचा : ब्राह्मणी धार्मिक सत्तेला लत्ताप्रहार देणारे छत्रपती राजाराम महाराज

‘राजर्षी’ या माझ्या पुस्तकाची पहिली मूळ संकल्पना दीपकचीच. कल्पना याच्या डोक्यात आली आणि संदीप बोरगावरकर, अनिकेत पाटील आणि सोमनाथ माने यांना घेऊन गडी माझ्या भेटीला आला. ‘राजर्षी’ त्याच्या पक्के डोक्यात बसलेलं. सगळी रुपरेखा डोक्यात एकदम पक्की. पुस्तकाला कागद कुठला वापरायचा, पुस्तकाची मांडणी कोणत्या प्रकारची पाहिजे , पुस्तकातील चित्रे मांडायची कशी, पुस्तक दिमाखदार व आकर्षक कसे बनवायचे याचा आराखडा डोक्यात पक्काच होता त्याच्या. एवढेच नव्हे तर आमच्या पहिल्या भेटीतच दीपक म्हणाला होता ‘उमेशदा, या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या माणसाच्या  हस्तेच करायचयं.’ हे शब्द अक्षरशः शक्य करून दाखवले त्याने. देशाचे नेते शरद पवार  कोल्हापूर दौऱ्यावर आल्याची खबर त्याला लागली.  तो  लोकराजा फोरमचे सगळे सदस्य घेऊन भेटीला घेऊन गेला. भेट घेऊन त्यांचा होकार मिळवला आणि २८ जुलै, २०१८ रोजी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ‘राजर्षी’ प्रकाशित झाले. त्या दिवशी कोण उत्साह संचारला होता या गड्याच्या अंगात. आजही त्याचा तो ‘कर्तव्यपूर्तीचा चेहरा’ मला खास आठवतो. ‘राजर्षी’ हे त्याचे स्वप्न होते आणि मोठ्या धडपडीने ते त्याने साकारले.

या रांगड्या गड्याशी छान मैत्री जमली. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी मी हक्काने बोलल्या आणि त्याने देखील काही अधिकाराने मला सांगितल्या. ‘उमेशदा, तुमचं घर होणार हो , काळजी करु नका’ हे वाक्य त्याच्या तोंडी कायमचे ठरलेल. माझ्या लिखाणाच्या कारकीर्दीचा मोठी  वाटचाल त्याच्या स्वप्नातूनच साकारली. रातोरात‘राजर्षी’ च्या १२ हजार प्रती खपल्या आणि आता दीपकच्या डोक्यात राजर्षी इंग्रजी भाषेत करायचं घोळत होतं. यावर आमचं बोलणं देखील झालं. दरम्यान लॉकडाऊन लागला आणि संवाद थांबला. मी अधेमधे त्याला फोन केले, मेसेज पाठवले; पण रिप्लाय नाही. शेवटी असे मनाला वाटले की , काही झालं तरी  हा पठ्ठा शाहू जयंतीला नक्कीच भेटणार. पण नेमके याच दिवशी त्याची ‘मृत्यूभेट’ ठरवली. शाहू त्याच्या धमन्यातून वहायचे. अखेर शाहूजयंतीलाच तो आम्हांला सोडून गेला.

वाचा : कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिवस; खानविलकरांच्या बंगल्यातील ‘ती’ गुप्त बैठक!

बातमी ऐकल्यापासून अत्यंत बेचैनी वाटली. त्याच्या अंत्यसंस्कारालाही  जाता आले नाही .दीपकच अंत्यदर्शन राहून गेलं. रात्री शांतपणे विचार केला तेव्हा मनोमन पटले की , एका अर्थाने माझ अंत्यदर्शन चुकले ते बरेच झाले. ‘मृत दीपक’ मला पाहवलाच नसता. यापेक्षा माझ्या मनात जो सजीव चळवळ्या कायम राहिलाय. त्यालाच मी जपेन माझ्या स्मृतीत. ‘उमेशदा , बघा तुम्ही, तुमच नाव लै मोठ होणारंय’  असं अत्यंत प्राजंळपणे दीपक हे बोलायचा तेव्हा कोण अभिमान वाटायचा मला. त्याच्या त्या शब्दात एक मोहमयी जादू होती. ते शब्द माझ्या कानांत मी साठवून ठेवलेत. जेव्हा कधी मला त्याची आठवण येईल तेव्हा त्याचे हे शब्द जबाबदारी  मानून मला प्रयत्नशील बनवतील एवढे नक्कीच. दीपक शरीराने गेलाय पण, त्याच्या प्राजळ रांगड्या भावना मात्र नेहमीच सजीव राहतील.

(लेखक ‘राजर्षी’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

 

Back to top button