सोलापूर : म्युकर मायकोसिसने 5 मृत्यू; नवे 12 रुग्ण  | पुढारी

सोलापूर : म्युकर मायकोसिसने 5 मृत्यू; नवे 12 रुग्ण 

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी म्युकर मायकोसिसने तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची तर नवे 12 रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी मात्र मृत्यू झालेले पाच रुग्ण चार दिवसांतील असल्याचे म्हटले आहे. रेकॉर्ड अपलोड न झाल्याने ते एका दिवसात दिसत आहेत, असा खुलासा केला आहे. दरम्यान, आतापर्यंत म्युकर मायकोसिसने जिल्ह्यात एकूण 62 जणांचा मृत्यू झाल्याने धोका आणखी वाढला आहे.

एकंदरीत कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येमध्ये घट होत असताना जिल्ह्यात म्युकर मायकोसिस या आजाराने मृत्यू होणार्‍याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूमुळे दररोज 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत होता; परंतु आता कोरोनामुळे मृत्यू होणार्‍याचे प्रमाण खूपच कमी झाले असून, म्युकर मायकोसिसने मृत्यू होणार्‍याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी म्युकर मायकोसिसचे 12 नवे रूग्ण आढळले आहेत. आजपर्यंत म्युकर मायकोसिसचे  524  रूग्ण आढळले आहेत. तर 22 रूग्ण शनिवारी बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 332 रूग्णानी म्युकर मायकोसिसवर मात केली आहे. 

सध्या 130 रूग्ण उपचार घेत आहेत. हे रूग्ण शहरातील सिव्हिल हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सर्वाधिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 50 ते 60 रूग्ण म्युकर मायकोसिसचे उपचार घेत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी म्युकर मायकोसिसने बाधित होणारी रूग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण रोखणे गरजेचे आहे. अन्यथा म्युकर मायकोसिस रूग्णाकडे लक्ष द्यायचे की, तिसरी लाटेची तयारी करायची असा दुहेरी प्रश्‍न आरोग्य यंत्रणेपुढे राहणार आहे. ग्रामीण भागात म्युकर मायकोसिस रूग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  

Back to top button