पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको : पोलिस उपायुक्त मितेश घट्टे | पुढारी

पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको : पोलिस उपायुक्त मितेश घट्टे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पत्रकारितेला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये, असे आवाहन पुण्याचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. 

उपायुक्त घट्टे म्हणाले, पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. काळानुरूप गुन्ह्यांच्या स्वरूपात बदल होत आहे. या बदलाची नोंद पत्रकारांनी घ्यावी. निष्पक्ष, तटस्थ व जबाबदार पत्रकारिता समाजाला पुढे घेऊन जाते. पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी अनेक स्रोतांची मदत घ्यावी लागते. परंतु, ही माहिती वस्तुनिष्ठ आहे का, याचा विचार पत्रकारांनी करायला हवा. पोलिस यंत्रणा पत्रकारांना अधिकृत माहिती देते. या माहितीवर पत्रकारांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

सूत्रांची माहिती किंवा ऐकीव माहिती दिल्याने अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. माहितीची खात्री होणार नसेल तर अशी माहिती टाळणे योग्य ठरेल. घाईने माहिती देणे अंगलट येऊ शकते. कोणत्याही घटनेचा विविध अंगाने परामर्श घेणेही तितकेच गरजेचे आहे. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृती जन्माला येऊ पाहत आहे. आर्थिक फसवणुकीसह अनेक प्रकारची व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशावेळी पत्रकारांबरोबर पोलिस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. पोलिस व पत्रकार यांनी एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींचा मुकाबला करणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात गुन्हेविषयक पत्रकारिता करताना संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेकडे पाहावे, असे आवाहन घट्टे यांनी केले. 

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले. ऑनलाईन व्याख्यानास कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Back to top button