दै. ‘पुढारी’चा आरोग्य संवाद वेबिनार शुक्रवारपासून | पुढारी

दै. ‘पुढारी’चा आरोग्य संवाद वेबिनार शुक्रवारपासून

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूने मानवी जीवनाचे एकूणच स्वरूप बदलून टाकले आहे. कोरोनापूर्व जग आणि कोरोनोत्तर जग, अशी जगाची थेट विभागणी झाली आहे. हे एक अत्यंत मोठे स्थित्यंतर आहे. संसर्गापासून बचाव ते अंगभूत प्रतिकार शक्तीतील वाढीच्या अंगाने एक व्यक्ती म्हणून सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने नेमकेपणाने काय करायला हवे आणि काय करायला नको, इथंपासून ते कोरोनामुळे बळावलेला संशय आणि नैराश्य या मनोदौर्बल्यातून बाहेर कसे पडावे इथंपर्यंत 360 च्या कोनात कोरोना उलगडणार आहे. राष्ट्रीय, सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून दै. ‘पुढारी’तर्फे ‘पुढारी’ च्या अधिकृत फेसबुक पेजवर 2 ते 4 जुलैदरम्यान खास वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. 

दै.‘पुढारी’ने सर्वांसाठी चार दिवसांचे हे सर्वंकष असे ‘कोरोना गाईडलाईन पॅकेज’ उपलब्ध करून दिले आहे. वेबिनारमध्ये शरीरविज्ञान, जीवाणू-विषाणू विज्ञान आणि मनोविज्ञान या क्षेत्रांतील जागतिक कीर्तीचे तीन दिग्गज सहभागी होणार आहेत. कोरोना काय आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, लागण का आणि कशी होते, परिणाम काय, हे आता जवळपास सर्वांना माहिती झालेले आहे. कोरोनाशी ‘जग कसे लढतेय’, ‘महाराष्ट्र कसा लढतोय’  याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नैराश्य, एकाकीपणा आदी मानसिक समस्यांचे समाधानही या खास वेबिनारमधून होणार आहे. 

‘कोरोना निदान आणि उपचारामध्ये रेडिओलॉजीचा वापर’ या विषयावर 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. प्रवीण घाडगे लंडन येथून संवाद साधणार आहेत. 3 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दुसरे पुष्प ‘कोरोनावरील लसीकरण, औषधोपचार आणि त्याचे पेटंट’ या विषयावर नाशिकच्या डॉ. मृदुला बेळे गुंफणार आहेत, तर 4 जुलैला सायंकाळी 6 वाजता पुणे येथील ख्यातनाम संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची ‘भारत कोरोनाशी कसा लढतो?’ या विषयावर मुलाखत होणार आहे.

डॉ. प्रवीण घाडगे (लंडन)

आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. रेडिओलॉजीमधील उच्च पदवीधर असून, एक तपाहून अधिक काळ सीटी स्कॅन व एमआरआयतज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. लंडनमधील आघाडीच्या क्वीन्स हॉस्पिटलमध्ये सध्या सेवा बजावत आहेत. विशेषकरून कोरोनाकाळात सीटी स्कॅन व इतर रेडिओलॉजीकल तपासण्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक निदान व विविध प्रकारचे उपचार करण्याकरिता त्यांच्या या अभ्यासाचा फायदा जगभरातील डॉक्टरांसह रुग्णांना होत आहे.

डॉ. मृदुला बेळे (नाशिक)

औषध निर्माणशास्त्रामध्ये डॉक्टरेट आहेत. लॉच्या पदवीधर असून, पुणे व इटली येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या त्या एन.डी.एम.व्ही.पी. फार्मसी कॉलेज नाशिक येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची तीन पुस्तके तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. कोरोनासंबंधित विविध प्रकारची औषधे, त्यांचे पेटंट तसेच कोरोनावरील लसीसंदर्भात त्यांचा गाढा अभ्यास असून, कोरोनाच्या लाटेमध्ये याचा फायदा सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.

पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (पुणे)

वैद्यकीय पदवीधर असून, साथ रोग व संसर्ग रोग यामध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविलेले आहे. पद्मश्री पुरस्काराने ते सन्मानित आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरील गाढे संशोधक आहेत. विशेषकरून एचआयव्ही, निफाह विषाणूवर त्यांनी विशेष संशोधन केले असून, त्याच्यामुळे उत्पन्न झालेली परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळलेली आहे. तसेच कोरोना विषाणूसह कोरोना साथ, उद्भवलेली परिस्थिती, कराव्या लागणार्‍या उपाययोजना, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कोरोनाविरुद्ध कसा लढा द्यावा, यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. 

Back to top button