राज्याच्या शिक्षक भरतीत आकड्यांचा खेळ | पुढारी

राज्याच्या शिक्षक भरतीत आकड्यांचा खेळ

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण सेवकांच्या सुमारे 12 हजार 140 जागा भरण्याची घोषणा सन 2017 ला केली होती. दोन याद्यांपैकी सुमारे पाच हजार उमेदवारांची केवळ एक यादी जाहीर करून प्रत्यक्षात मात्र तीन ते साडेतीन हजार शिक्षक रूजू झाले. त्यातील बर्‍याचशा जागा रिक्तच आहेत. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६१०० रिक्तपदे भरण्याची घोषणा केली. या रिक्तपदांचे वर्गीकरण मात्र शासनाने स्पष्ट केलेले नाही. मोठमोठ्या आकड्यांच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निम्मीच पदे भरायची असा आकड्यांचा खेळ शासनाने थांबवून प्रत्यक्ष रिक्तपदांचे वर्गीकरण जाहीर करावे, अशी मागणी राज्यातील डीएड्, बीएड् धारकांनी केली आहे.

वाचा :व्हेल माशाची पाच कोटी रुपयांची ‘उलटी’ घेऊन जाणारा जेरबंद! ती कशासाठी वापरतात माहीत आहे का?

शिक्षक भरतीची प्रक्रिया डिसेंबर 2017 पासून सुरू करण्यात आली ती अद्याप पूर्ण झालेली नाही. या भरतीप्रक्रियेची पहिली यादी 9 ऑगस्ट 2019 ला जाहीर झाली. दुसरी यादी 16 ऑगस्टला जाहीर होणार होती. मात्र डीएड्, बीएड् धारकांच्या विरोधामुळे व विविध याचिका दाखल झाल्याने दुसर्‍या यादीला स्थगिती देण्यात आली. ही भरती प्रक्रिया मुलाखत व मुलाखतीशिवाय अशी दोन टप्प्यांमध्ये होणार होती. त्यानंतर शिक्षक भरतीविरोधात अनेक याचिका दाखल झाल्याने प्रक्रियेवर स्थगिती आली. त्यातच कोरोनाचे संकट आल्यामुळे राज्य शासनाने भरती प्रक्रियेला 4 मे 2020 च्या आदेशाने तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६१०० रिक्तपदे भरण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. रखडलेली भरती आता मार्गी लागणार असल्याने डीएड्, बीएड् धारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र रिक्तपदांचे वर्गीकरण शासनाने जाहीर न केल्याने संभ्रम कायम आहे.

मुलाखतीशिवाय होणार्‍या पदभरतीची पहिली यादी ९ ऑगस्ट २०१९ ला जाहीर झाली होती. ९ हजार १२८ जणांच्या जाहीर यादीतून ५८२२ जणांची निवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार उमेदवारच प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झाले. शाळांवर रुजू न झालेले गैरजहजर अपात्र उमेदवार, गणित व विज्ञानचे पात्र शिक्षक न मिळाल्याने रिक्त राहिलेल्या जागा, माजी सैनिकांच्या रिक्त सुमारे १२०० जागा, ब्रिजकोर्सच्या याचिकेमुळे रिक्त राहिलेल्या १ ते ५ वी पर्यंतच्या ४०० जागा अशा एकूण सुमारे साडेतीन हजार जागा पहिल्या यादीनंतर रिक्त राहिल्या आहेत. मुलाखतीशिवाय या हजारो रिक्त जागा भरणे आवश्यक होते. मात्र असे न करता आता मुलाखतीसह असलेल्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे १२ हजार १४० पदांची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र तीन ते साडेतीन हजार शिक्षक मुलाखतीशिवाय शाळांवर रुजू झाले आहेत. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त राहिल्या आहेत. खासगी व्यवस्थापनातील ९ ते १२ वी साठी १९६ जागांची यादी मे २०२१ मध्ये जाहीर करण्यात आली.

माजी सैनिक, गैरहजर अपात्र व तत्सम १७९६ रिक्त पदे भरण्यास अडथळे असल्यामुळे ही पदे यापूर्वीच वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता जाहीर केलेल्या नेमक्या ६१०० जागा कोणत्या व कशा भरणार? याचे वर्गीकरण शासनाने जाहीर करावे, अशी मागणी राज्यातील डीएड्, बीएड् धारकांनी केली आहे.

जास्त गुण असणार्‍यांवर भरतीत अन्याय

विनामुलाखतीसह भरती प्रक्रिया करण्याच्या हजारो जागा शिल्लक असताना मुलाखतीसह भरती राबविण्याचा शासनाचा निर्णय अतिशय चुकीचा असून त्यामुळे गुणवत्ता धारकांवर अन्याय होणार आहे. जास्त गुण असणार्‍यांची जिल्हा परिषद शाळांवर निवड होऊ शकते. मात्र अशा अभियोग्यताधारकांना संस्थांमध्ये पैसे भरून नोकरी मिळवण्याची वेळ या निर्णयाने आली आहे, अशी प्रतिक्रिया कोकण डीएड्, बीएड् धारक संघटनेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर यांनी दिली आहे.

वर्गीकरण स्पष्ट करून रिक्त जागा याच भरतीत भराव्यात


अधिवेशन आले की भरतीचे आकडे फुगवून सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र अनेक जागा रिक्‍त ठेवायच्या, असा प्रकार या भरतीत सुरू आहे. मुलाखतीशिवाय होणार्‍या भरतीतील हजारो जागा रिक्त असताना आता मुलाखतीसह होणारी भरती सुरू केली आहे. हे वर्गीकरण स्पष्ट करून रिक्त जागा याच भरतीत भराव्यात.


– राहुल खरात, अभियोग्यता धारक

वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुसळधार

वाचा :  व्हेलच्या उलटीची तस्करी करणारा निघाला पॉझिटिव्ह 

Back to top button