हरिनामाचा जयघोष हा पायी वारीचे वैभव आहे! | पुढारी

हरिनामाचा जयघोष हा पायी वारीचे वैभव आहे!

पंढरीची पायी वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे. ते विचार, आचार व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठी चालायचं…इतरांचे विचार, अनुभव समजावून घेणे, सुख-दुःखाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी होय. 

प्रेमाचं देणं, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दवा, बुद्धीसाठी दवा हीच पंढरीच्या पायी वारीची हवा. या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा, पद, प्रतिष्ठा विसरणे म्हणजेच, पंढरीची पायी वारी. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हेसुद्धा या वारीमध्ये देवमान्य होतात व आपला मोठेपणा विसरून गळ्यात टाळ घेऊन विठुमाऊलीच्या हरिनामाच्या जयघोषामध्ये दंग होतात. हे या पायी वारीचे वैभव व मोठेपण आहे. पंढरीची वारी हेच वारकर्‍यांचे आनंदविश्व आहे. 

एक दिवस तरी ही वारी आपण अनुभवावी. ही वारी मी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ अनुभवत आलो आहे. सलग दुसर्‍याही वर्षी कोरोनामुळे पायी वारी व माऊलींच्या मुक्कामाची परंपरा खंडित होत आहे, असे मत नातेपुते गावचे ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. मनोहर महाराज भगत यांनी मांडले. 

माऊलींच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशानंतर पहिले मुक्कामाचे ठिकाण म्हणजे नातेपुते. शंभू महादेवांची नगरी म्हणून व माऊलींच्या मुक्कामाचे गाव म्हणून नातेपुते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून नातेपुते मुक्कामी पालखी सोहळा असतो. आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत या सोहळ्यात येत असतात. त्या दिवशी सर्व परिसर अगदी टाळ, वीणा, मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा… तुकाराम…’ या जयघोषाने अगदी दुमदुमून जातो. डौलाने फडकणार्‍या पताका, डोळ्यांचे पारणे फेडणारी माऊली रथावरील आकर्षक रंगबिरंगी फुलांची सजावट, ‘माऊली… माऊली…’ नामाचा अखंड नामजप, रस्त्यारस्त्यांवर रांगोळीचे आकर्षण करून मोठमोठ्या स्वागतकमानी उभ्या करून गावच्या वेशीवरती फटाके व तोफेची सलामी देऊन माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येते आणि पालखीतळावर समाज आरती होते. हा सुखसोहळा स्वर्गीही नाही. 

गावामध्ये पायी येणार्‍या प्रत्येक वारकरी भाविकांसाठी रस्त्यारस्त्यांवर ते गावामध्ये चहापाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था विविध मंडळांकडून केली जाते. प्रचंड गर्दी तरी पण सारे काही शिस्तबद्ध, ना कुठे गडबड ना गोंधळ. गल्लीबोळांतून फक्त विठुनामाचा गजर, हरिनामाचे स्वर ऐकू येतात. माऊलींच्या पालखी सोहळ्याइतपत मोठा उत्सव-यात्रा नातेपुते गावात भरत नाही. वर्षभराचा हाच सर्वात मोठा उत्सव गावासाठी आहे. नांदायला गेलेल्या सासुरवाशिणी एखाद्या वेळी दिवाळी सणाला येणार नाहीत; पण या दिवशी पालखीला येतात. आपले नातेवाईक, मित्रमंडळी गावातील स्थलांतर झालेले लोकसुद्धा आपल्या गावाचा उत्सव, सण, यात्रा म्हणून दरवर्षी न चुकता गावामध्ये येत असतात. 

प्रत्येकाच्या मनामधील भावना अशी आहे की, माऊलीबरोबर येणार्‍या प्रत्येक वारकर्‍याला आपल्या घरातील अन्न मिळाले पाहिजे आणि एकही वारकरी आपल्या गावातून उपाशी गेला नाही पाहिजे. वारकरी जेवला म्हणजे प्रत्यक्षात माऊलींना आपल्या घरचा नैवेद्य पोहोचला. आमचे आणि वारकर्‍यांचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे आहे. गावातील प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेद्य असतो. गावातील सर्व स्तरांतील व्यापारी वर्गाची अशी भावना आहे की, पालखीसोहळा म्हणजे, वर्षभरातील व्यापारातील महापर्वणी आहे. कारण, लाखो रुपयांची उलाढाल या काळामध्ये होत असते. पालखी मुक्कामी यायच्या अगोदर सुमारे एक महिना व्यापारी मोठ्या प्रमाणात आपल्या व्यवसायात गुंतवणूक करून ठेवतात. सर्व ग्रामस्थसुद्धा आठ दिवस अगोदर तयारीला लागतात. 

गावामध्ये पालखी यायच्या अगोदर मनोरंजनाची साधने, विविध प्रकाराचे पाळणे, झोके, खेळण्यांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, हॉटेल ही सर्व दुकाने सजलेली असतात. नातेपुते गाव म्हणजे इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन पांडुरंगमय होणे. कोरोनामुळे हा सोहळा होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. ‘पंढरीची वाट, वैष्णवांचा थाट, दिसे नातेपुते सुनेसुने, दिसेना भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाची धून, दिसेना रस्त्यावर वारकरी, भाविकांविना सुनी सुनी वाटे नातेपुते नगरी, आगा विठुराया येऊ दे गा दया, सोडवी या कोरोना महाभया पासुनिया,’ अशी विठुरायाकडे आर्त विनवणी आहे. 

                                                                                                                                                                                                                                 -(शब्दांकन : सुनील गजाकस)

 

Back to top button