जगण्याच्या व्याप्तीमध्ये भक्ती ही वारकरी संप्रदायाची शिकवण | पुढारी

जगण्याच्या व्याप्तीमध्ये भक्ती ही वारकरी संप्रदायाची शिकवण

वारकरी संप्रदायाची शिकवण ही फक्त भक्ती मार्गापुरती नाही, तर जगण्याच्या व्याप्तीमध्ये भक्ती हा एक भाग आहे. तिच्या बाहेर अनेक गोष्टी असतात; ज्या आपल्याला हव्या असतात. त्या आपण टाळू शकत नाही. त्यामुळे संतांनी फक्त भक्तीबद्दलचं सांगावं आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलायचं नाही, असं नाही होऊ शकणार. 

जगण्याच्या प्रत्येक पैलूबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असतं. त्या पैलूंना बैठक जी असते ती त्यांच्या भक्तीची असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे की, बाकीच्या गोष्टींशी त्यांचा काय संबंध असतो. मग, समाजकारण असेल, राजकारण असेल, संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टींसंदर्भात त्यांना काहीतरी म्हणायचं असतं. या सगळ्या संतांचं जे लेखन आहे ते मुख्यत्वे करून भक्तिमार्गावर आहे.

तेराव्या शतकापासून वारकरी संप्रदायातले जे शेवटचे संत होऊन गेले संत निळोबाराय. १३ ते १८ वी शतकं म्हणजे ५०० वर्षांपर्यंत सलग महाराष्ट्रामध्ये साहित्य निर्माण करणारे लोक हे मुख्यत्वे करून वारकरी संप्रदायातले होते. इतरांनी साहित्य लिहिलं नाही असं नाही. परंतु; त्यांच्या साहित्याचा तेवढा प्रभाव नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे शाहीर आपल्याकडे होऊन गेले. त्यांची शाहिरी पेशवाईच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत चालली होती. दरम्यानच्या काळात लावण्या लिहिणारे लोक आले. त्यांच्या कविता म्हणून चांगल्या आहेत. त्या काळापुरत्या त्या मर्यादित राहिल्या. त्यांचा कुठे प्रभाव पडला नाही. तीच गोष्ट जे काही पंडित, कवी त्यांचाही जनमानसांवर प्रभाव पडला नाही, भाषेवरती फारसा प्रभाव पडला नाही. 

संतांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येतं की, ५०० वर्षे मुख्य प्रवाहात मराठी भाषेत साहित्य निर्माण करणार्‍यांमध्ये संतांचा समावेश आहे. तुम्ही एखादं साहित्य लिहिता, एखादी गोष्ट तयार करता, म्हणजे तुम्ही भाषेला काहीतरी योगदान दिलेलं असतं. हे योगदान संतांचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि बाकीच्या संतांनी अभंग, ओव्या लिहिण्याच्या अगोदरपासून महानुभाव पंथाची साहित्यनिर्मिती सुरू होती. लीळाचरित्र हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही अगोदरचा आहे. दुर्दैवाने थोड्याच वेळाने महानुभाव सांप्रदायिकांनी असा निर्णय घेतला की, आपलं जे काही तत्त्वज्ञान आहे, आपला जो काही विचार आहे तो संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना कळता कामा नये. जो अधिकृतपणे पंथात येईल, दीक्षा घेईल त्यालाच फक्त ते सांगायचं. ते आपला ग्रंथ वाचणारे हवेत. म्हणून त्यांनी चक्क सांकेतिक लिप्या निर्माण केल्या. ते चुकून कोणाच्या हातात पडलं तरी त्याला ते वाचताच येऊ नये. त्यामुळे महानुभावांचा लीळाचरित्र हा अतिशय श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो संपूर्ण सांकेतिक लिपीत आहे. मग, ते सांगणारं कोण तर अधिकृत दीक्षा घेतलेले लोक…

त्यामुळे महानुभावांचं एवढं चांगलं साहित्य असूनही त्याचा परिणाम महानुभाव नसणार्‍या आणि महाराष्ट्राच्या खूप मोठ्या व्यापक भागात असणार्‍या लोकांवर होऊ शकला नाही. जणू काय त्यांचं होतं ते त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलं. याउलट वारकर्‍यांचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं पहिल्यापासून त्यांचं साहित्य सर्वांसाठी होतं. तेव्हा त्यासाठी वारकरी असण्याची गरज नव्हती. आस्तिक असण्याची गरज नव्हती. धार्मिक असण्याचीही गरज नव्हती. त्यामुळे सगळ्या लोकांवरती संतांच्या ग्रंथांचा प्रभाव पडला. त्यातून मराठी भाषा घडत गेली. मराठी भाषा ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत निळोबारायांपर्यंत घडत गेली. ती संतांच्या रचनांमधून घडली. तुकोबांच्या कितीतरी रचना अशा आहेत की, ज्या मराठी भाषेत म्हणी म्हणून स्वीकारल्या गेल्या. लोक ते आपलंचं आहे म्हणून त्याचा वापर करू लागले. मराठी भाषेच्या जडणघडणीवरती संतांच्या साहित्याचा प्रभाव दिसतो. 

ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये परचक्र आलं आणि महाराष्ट्रात इस्लामी सत्तेचा अंमल सुरू झाला. त्या काळात सर्व राज्य व्यवहार मराठीत व्हायचा; पण पारसी भाषा आली. ती राज्यकर्त्यांची भाषा बनली. त्यामुळे प्रशासनामध्ये पर्शिअन शब्द येऊ लागला. लोकांच्या व्यवहारात पर्शिअन शब्द येऊ लागले. तो जगण्याचा मुद्दा बनला. तेव्हा पर्शिअन भाषेचा मराठी भाषेतही प्रभाव पडला. सर्व संतांच्या भाषेतही तो प्रभाव दिसून येऊ लागला. हा त्यातला एक मुद्दा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आपल्याला स्वराज्य मिळालं आणि पुन्हा एकदा आपल्या राज्य व्यवहाराची भाषा मराठी झाली. मग, पुढे पेशवाईपर्यंत शुद्ध मराठीचं वातावरण राहिलं. पुन्हा आपल्यावर इंग्रजांचं राज्य आलं. वेगळी संस्कृती आली, एक वेगळी मूल्यव्यवस्था आली. ज्ञानाची वेगळी भाषा आली. त्यावेळी ती आपल्याकडील लोकांना शिकावी लागली. साहजिकपणे मग आपली संतांनी घडविलेली मराठी आणि इंग्रजीच्या संपर्कातून मराठीवर होणारा परिणाम अशी दोन भाषांची जोड झाली. मग, एक वेगळ्या प्रकारची मराठी घडली.

प्रवासात पुढे जाताना भाषेचा विकास होत असतो. त्याचं उदाहरण म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला. ती कशी घडली, परकीय राज्याप्रमाणे तुमचं जीवनमान बदलतं. तुमच्या गरजा बदलतात आणि मग गरजांची अभिव्यक्तीही बदलते. त्यासाठी शब्द लागतात, वाक्यांचे नवनवीन प्रवाह लागतात. असं झालं तरच तुमची भाषा प्रभावी राहते. अशा पद्धतीनं तो एक मेळ बसला. तो चिपळूणकरांच्या निबंधमालेतून दिसतो. त्यानंतर मराठी भाषा बोलणार्‍या सुशिक्षित लोकांची भाषा ही मुख्यत्वे करून चिपळूणकरांची भाषा झाली. याचा अर्थ संतांनी निर्मिलेली जुनी भाषा कुठे गेली नाही. चिपळूणकरांच्या भाषेवरसुद्धा संतांच्या भाषेचा प्रभाव आहेच. भाषेचा विकास होताना संतांच्या साहित्याचा वारंवार उपयोग झालेला आहे. याचा प्रत्यक्ष जगण्याशी संबंध आहे. भाषेच्या विकासाशी त्याचा संबंध आहे. 

इंग्रजी भाषेतील मुक्तछंद मराठीत आणण्याचा प्रयत्न झाला. गद्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कांदबरीचं लिखाण…निबंधाचं लिखाण हे इंग्रजी भाषेच्या अनुकरणातूनच आलं. मुळात मराठी भाषा तेवढी सक्षम होती, अनुकरण करण्यासाठीसुद्धा ती क्षमता, सामर्थ्य मराठी भाषेत आहे. मुळात आपणच सुरुवात केली ती संस्कृतमध्ये व्यक्त झालेल्या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाची. अभिव्यक्ती मराठीतून करता आली पाहिजे. ती अभिव्यक्ती प्रामाणिक असली पाहिजे. त्यापुढं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं होती की, तत्त्वज्ञान तुम्हाला कळत नसेल तर काही हरकत नाही. नुसती कविता म्हणून त्याकडे पाहा. तरीदेखील ते श्रेष्ठ  झालेलं वाटेल…

हा एक वेगळा आविष्कार, वेगळा प्रयोग सतत ही मंडळी करत गेली. एकीकडे भारुडं लिहिण्यात आली. भारुडं म्हणजे पथनाट्य. त्याला कुठलाही विषय वर्ज्य नाही. भारुडात चुकीच्या सामाजिक प्रथांवरती भाष्य करू शकता. संत एकनाथ महाराजांच्या भारुडांमध्ये सामाजिक समीक्षा आहे. समाजाची, धर्माची, जातिव्यवस्थेची समीक्षा केलेली आहे. चुकीच्या गोष्टींवरती टीका केलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे आपल्याला भाषेतून करता येतं. भाषा खूप महत्त्वाची आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं की, प्राकृत भाषा ही काय चोरांनी उत्पन्न केलेली भाषा आहे की काय? ती निदान माणसांची आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. येथे भाषेचा अभिमान आहे. राष्ट्राचासुद्धा अभिमान आहे. 

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी साहित्यगुण असावे लागतातच. भाषा हा माणसाच्या संस्कृतीचा पाया आहे. भाषेशिवाय संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. मराठी भाषेशिवाय संस्कृती उभीच राहू शकत नाही. ही संस्कृती जी मराठी माणसांची आहे, ती मराठी भाषेमुळे निर्माण झालेली आहे. हा अभिमान आपण टिकवल्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी झाली ५० च्या दशकात आणि शेवटी ६० साली महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. ते राज्य मराठी माणसांचं होतं. मराठी माणूस कोण, तर जो मराठी बोलतो तो. मग, त्याचा जातधर्म कुठलाही असेल, तो कोणत्याही विचारांचा असेल. तो मराठी म्हणून जन्माला आला आहे. त्यामुळे इथल्या कम्युनिस्टाला कार्ल मार्क्सने सांगितलं ते मराठीत सांगण्याची गरज होती. ते झालंही. डाव्या पक्षाचे जे लोक आहेत, ते कार्ल मार्क्स मराठीत कसा आणायचा यासाठी झगडले. ही जिवंतपणाची खूण आहे. मराठी ही समर्थ आणि सक्षम भाषा आहे. ती संतांनी निर्माण केली आहे. संतांच्या या मराठी भाषेचा वापर आज सर्वांना करावा लागतो.

-डॉ. सदानंद मोरे (लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक)

 

Back to top button