

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेअभिनेता सलमान खान (Salman Khan) याला सोमवारी पुन्हा एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली. घरात घुसून मारहाणीसह त्याची कार बॉम्बने उडवून देणार असल्याचे या धमकीत म्हटले आहे. सलमानने यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याने नुकतेच जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सलमानने व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, "थँक यू फॉर द मोटिवेशन." त्याच्या या पोस्टवर अभिनेता वरुण धवनने इमोजी टाकली आहे, तर रणवीर सिंगने "HARD HARD" अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, वरळी पोलिसांनी सलमानला धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. यात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या परिसरातून सहा संशयितांना अटक केली होती. त्यात गोळीबार करणाऱ्या दोन शूटरचा समावेश होता. सोमवारी सलमानला पुन्हा धमकी आली. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. यात सलमानला त्याच्या घरात घुसून मारहाण तसेच बॉम्बस्फोटाने त्याची कार उडवून देण्याची धमकी दिली आहे. ज्या मोबाईलवरून ही धमकी देण्यात आली, त्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.