

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील कोणत्याही कलाकाराच्या चांगल्या कृतीचे कौतुक होते आणि वाईट कृती केल्याचे वाटल्यास नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते. आता अभिनेत्री काजोल हिने एका मुलाखतीत ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. काजोल म्हणते की, लोकांना कलाकारांच्या आयुष्यातील चांगली बाजू दिसते; पण त्यामागची मेहनत दिसत नाही. मी संपूर्ण आयुष्य सोशल मीडियाशिवाय जगले आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. ते काही खरे आयुष्य नाही. रेड कार्पेटवरील तुम्ही माझे फोटो तिथे पाहू शकता. पण, मी तयार होण्यासाठी सकाळी ५ वाजता झोपेतून उठते. अकरा वाजण्याच्या सुमारास थकून परत घरी येते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जाते, हे तुम्ही पाहू शकणार नाही.
तुम्ही कलाकारांच्या आयुष्यातील काही भाग पाहू शकता. अन्य लोक कष्ट करतात तेवढेच कलाकारही कष्ट उपसत असतात. आमचेही चांगले आणि वाईट दिवस येत असतात; पण तरीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते, त्यावेळी हसत असते. मी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर वेगळ्या दृष्टिकोनातून बघते. लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात, त्यावेळी त्यांना वाटते की, तिरस्कार करण्याचाही त्यांना हक्क आहे. त्यामुळे मी म्हणणार नाही की, ते बरोबर आहेत.