पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja health) शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर सर्जरी झाली आहे. यामुळे त्याला डॉक्टरांनी सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
यशोदा हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.२४) सर्जरी झाल्यानंतर त्याला रविवारी(दि.२५) लगेच डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या चाहत्यांना आपली काळजी वाटू नये, यासाठी स्वत: रवी तेजा याने आपल्या 'एक्स'वर पोस्टद्वारे ही माहिती दिली. यशस्विरित्या सर्जरीनंतर मला डिस्चार्ज मिळाला असून तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनाबद्दल आभारी आहे, असे म्हणत त्याने आपल्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रवी तेजा याचा दमदार ॲक्शन असणारा आगामी चित्रपट RT 75 येत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना रवी तेजा याच्या उजव्या हाताच्या मांसपेशीला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाली असतानाही त्याने चित्रपटाचे चित्रीकरण सुरू ठेवले. त्यामुळे त्याचे हाताचे दुखणे वाढले. डॉक्टरांनी त्याच्या हातावर सर्जरी केली आहे. यशोदा हॉस्पिटलमध्ये त्याच्या हातावर शनिवारी सर्जरी झाली. डॉक्टरांनी त्याला ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला दिल्याने त्याला चित्रीकरणापासून काही दिवस दूर राहावे लागणार आहे.