‘इंडियन आयडल मराठी’ : गायिका साधना सरगम यांची एन्ट्री होणार | पुढारी

'इंडियन आयडल मराठी' : गायिका साधना सरगम यांची एन्ट्री होणार

पुढारी ऑनलाईन

सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम सुरू झाला आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. हे स्पर्धक रसिकांच्या कौतुकास पात्र ठरताहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका साधना सरगम यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत. साधना सरगम यांनी १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘विधाता’ या चित्रपटातली ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहे.

‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने ९० च्या दशकात धूम केली होती. हे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधना या मराठी मुलीने तब्बल ३४ भाषांत गीतं गायली.

कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना या ‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम पाहा, ‘इंडियन आयडल मराठी’, २० आणि २१ डिसेंबर, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलं का? 

Back to top button