पुढारी ऑनलाईन डेस्क
खरी प्रतिभा ही सामाजिक स्थिती अथवा आर्थिक अडचणींची कधीच पर्वा करत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे एका रिक्षाचालकाची १५ वर्षांची मुलगी. जी मुंबई बाहेर एक नवीन रॅपर म्हणून चर्चेत आली आहे. तिचे नाव आहे सानिया मिस्त्री (Saniya Mistri). ती ११ वी मध्ये शिकते. तिने ३ वर्षापूर्वी हिप-हॉप जगात पाऊल ठेवले होते आणि तेव्हापासून ती रॅपर म्हणून काम करत आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात तर आई अनेक कामे करुन ते आपले घर चालवतात. पण, तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे तिच्यातील सर्जनशीलता चमकण्यापासून थांबली नाही.
सानियाकडे ((Saniya Mistri) एक स्मार्टफोनदेखील नाही. यामुळे तिला आपला आवाज रेकॉर्ड करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. ती मुंबई पूर्व भागातील गोवंडी भागात रहाते. तिला सर्वजण सानिया एमक्यू (Saniya MQ) नावाने ओळखतात. महेनतीचं आणि आजूबाजूच्या जीवनातून भयंकर अनुभव घेत गरिबीत जगणाऱ्या लाखो लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा तिचा अतूट संकल्प हे तिच्यातील वेगळेपण आहे.
जेव्हा तिने पहिल्यांदा रॅपर म्हणून सुरुवात केली तेव्हा अनेकांनी ती धारावीतील रॅपर्सपैकी एक असल्याचे गृहीत धरले. पण, तिने रॅपर म्हणून हळूहळू मुंबईच्या हिप हॉप क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. सानियाने हल्लीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'फ्यूचर का क्या', 'जनता है कौन', 'भ्रम' आणि 'बहोत धीट' या नवीन गाण्यांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सानिया तिच्या युट्यूब चॅनेलवरदेखील तिच्या गाण्याचे व्हिडिओ अपलोड करत असते. सध्या तिचे काही हजारांत फॉलोअर्स आहेत. पण प्रतिकूल परिस्थितीत रॅपर म्हणून तिचा हा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.
तिला आलेल्या अडचणींबद्दल विचारले असता, सानियाने हल्लीच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझ्या आई वडिलांना माझ्यातील रॅप कौशल्याबद्दल आणि कलाकार म्हणून कारकीर्दीबद्दल काही कल्पना नव्हती. पण, मी पहिल्यांदा सार्वजनिक स्वरुपात परफॉर्म करताना पाहिल्यावर माझ्या आईला खूप आनंद झाला होता.
हे ही वाचा :