'मी होणार सुपरस्टार' : नेहुल वारुळे-समीक्षा घुले ठरले महाविजेते

पुढारी ऑनलाईन
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. द लायन्स क्रु, विजय-चेतन, नेहुल–समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पुण्याच्या नेहुल वारुळे-समीक्षा घुले यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. उपविजेते ठरले द लायन्स क्रु. विजय-चेतन ही जोडी ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी. तर मायनस थ्री ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना नेहुल वारुळे-समीक्षा घुले दोघंही भावूक झाले होते.
हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना दोघांनीही व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात समीक्षाच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र तरीही खचून न जाता समीक्षा आणि नेहुलने बेस्ट परफॉर्मन्स दिला. महाअंतिम सोहळ्यातला हाच परफॉर्मन्स त्यांना विजेतेपद देऊन गेला. चार वर्षांपूर्वी ओम डान्स क्लासमध्ये दोघांची ओळख झाली.
जेव्हा मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाविषयी कळलं तेव्हा दोघांनीही या कार्यक्रमात सामील होण्याचं ठरवलं. नृत्यात वेगवेगळे प्रयोग सादर करत दोघांनीही अंतिम सोहळ्यात धडक मारली. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे दोघंही आनंदात आहेत.
वारुळेसाठी या स्पर्धेची मिळालेली रक्कम खूप महत्वाची आहे. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत वारुळेच्या आईने त्याला आणि त्याच्या भावाला मोठं केलं. घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईवर आहे. पुण्यात एक छोटं पार्लर चालवून वारुळेची आई त्याचं आणि त्याच्या भावाचं स्वप्न पूर्ण करते आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पार्लर बंद झालं.
उत्पन्नाचं एकमेव साधन बंद झाल्यामुळे घराचं आणि पार्लरचं भाडं देणं शक्य झालं नाही. या बक्षीसाच्या रकमेतून वारुळे त्याच्या आईला हातभार लावणार आहे. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमामुळे दोघांनाही नवी ओळख मिळाली आहे. या दोघांनाही आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवायची आहे. वारुळे आणि घुलेच्या पुढील वाटचालीसाठी दोघांनाही स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
हेही वाचलं का?
- मी बायसेक्शुअल नाहीये, अजूनही नुसरतवर माझं प्रेम : निखिल जैन
- Janhvi Kapoor’s gorgeous look : जान्हवीच्या ब्लॅक शिमर ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा
- सांगली : ‘अरुण लाड यांनी खरे दगाबाज कोण ते शोधावे’