Yadu Vijayakrishnan :संस्कृत सिनेमांनाही व्यासपीठ मिळाले पाहिजे | पुढारी

Yadu Vijayakrishnan :संस्कृत सिनेमांनाही व्यासपीठ मिळाले पाहिजे

पणजी : पुढारी वृत्तसेवा

१९९० पासून २०२१ या कालावधीत इफ्फीमध्ये केवळ दोन संस्कृत चित्रपट निवडण्यात आले आहेत. यापैकी २०१५ साली एक चित्रपट होता. तर यावर्षी शुक्रवारी (२५ रोजी) भगवदजुकम् या सिनेमाचे सादरीकरण झाले. यानिमित्त या सिनेमाचे दिग्दर्शक यदु विजयकृष्णन (Yadu Vijayakrishnan) यांच्याशी संवाद साधला असता. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले.

संस्कृत भाषा टिकली पाहिजे 

संस्कृत ही आपली पारंपरिक भाषा आहे. सध्या आपण बोलीभाषा म्हणून तिचा वापर करत नसलो तरी ती भाषा टिकणे गरजेचे आहे. या सिनेमांना व्यासपीठ मिळणेही तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच मी हा सिनेमा संस्कृत भाषेत केला. हे माझे इफ्फीत येण्याचे पाचवे वर्ष आहे. पण मी पहिल्यांदाच सिनेमा घेऊन येत आहे.

भगवदजुकम् ही बोथायाना यांनी ७ व्या शतकात लिहिलेल्या महाकाव्यावरून घेतली आहे. बुद्धिस्ट तत्वज्ञान व हिंदू तत्वज्ञान यांच्यातील मतभेद मांडणारी ही कथा आहे. एक धम्म, त्याचा शिष्य आणि एक वेश्या यांच्याभोवती ही कथा फिरते. यमदेवाकडून चुकून वेश्येचा प्राण घेतला जातो. तेव्हा धम्म तिच्या शरीरात प्रवेश करतो. आपली चूक लक्षात आल्यावर यमदेव परत येतो. आणि हे लक्षात आल्यावर तो वेश्येचा प्राण धम्माच्या शरीरात टाकतो. या परकाया प्रवेशानंतर पुढे जे घडते याची ही  कथा आहे.

याआधी जे संस्कृत सिनेमे बनवले आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत. मला काहीतरी वेगळे करायचे होते म्हणून मी तत्वज्ञान सांगत असताना त्याला थोडे रंगीत करण्याचा आणि कॉमेडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमामध्ये एक संस्कृत गाणेही आहे. विष्णू व्ही. दिवागरन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून शिवप्रियाने ते गेले आहे.  किरणराज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा सिनेमा

मी केरळ या भागातून येतो. दाक्षिणात्य सिनेमामध्ये व्यावसायिक सिनेमे मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र मल्याळम भाषेत विशेषतः केरळ मध्ये कलाप्रधान, समांतर चित्रपट करण्याकडे अधिक कल असतो. इतर मसाला न घालता लोकांचे आयुष्य मांडण्याचे काम मल्याळम सिनेमा करतो. अधिक संख्येने चित्रपट संस्था, महाविद्यालये असल्याने चित्रपट निर्मितीसाठी आपोआपच प्रोत्साहन मिळते. माणसाच्या जगण्याभोवती फिरणारा, जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा सिनेमा बनत असल्याने एक वेगळा, सुजाण प्रेक्षक वर्गही या भागात पाहायला मिळतो. म्हणूनच या महोत्सवातही तुम्हाला अनेक मल्याळम प्रेक्षक पाहायला मिळतील. असेही ते म्हणाले.

एक वेगळा, सुजाण प्रेक्षक वर्ग

भारतात असे बरेच प्रदेश आहेत जे हिंदी भाषा स्वीकारत नाहीत. भाषिक वाद खूप आहेत. पण संस्कृत ही एकमेव भाषा आहे. जी भारताच्या  प्रत्येक भागातील लोकांना महत्वाची वाटते. विविध भाषांमध्ये संस्कृतचे अनेक शब्दप्रयोग आहेत. त्यामुळे ती सर्वत्र स्वीकार्य आहे. त्यामुळे ही एकमेव भाषा आहे जी भारताला बांधून ठेवू शकते असे ते म्हणाले.

हेही पाहा : पन्हाळ्याचा ऐतिहासिक तीन दरवाजा | जागतिक वारसा सप्ताह विशेष

Back to top button