HBD : अमिताभ बच्‍चन यांच्या विषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

वाढदिवस विशेष : अमिताभ बच्चन
वाढदिवस विशेष : अमिताभ बच्चन
Published on
Updated on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन यांचा ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अलाहाबाद येथे ११ ऑक्‍टोबर १९४२ रोजी HBD अमिताभ बच्‍चन यांचा जन्‍म झाला. प्रख्‍यात कवी हरिवंशराय बच्‍चन हे त्‍यांचे वडील. त्‍यांचे खरं नाव श्रीवास्‍तव; पण वडिलांनी कवी म्‍हणून स्‍वीकारलेले बच्‍चन हेच नावे त्‍यांना मिळाले.

अमिताभ यांनी भारतीय सिनेसृष्‍टीतील पारंपरिक अभिनेत्‍याची सगळी परिमाणे बदलून टाकत ७० मि.मी. पडदा एकट्‍यांनी व्‍यापला. १९७३ साली रिलीज झालेला चित्रपट जंजीरमधील 'ये पुलिस स्‍टेशन है, तुम्‍हारे बाप का घर नही,' असे डोळ्‍यात डोळे भिडवून खलनायकाच्‍या खूर्चीला लाथ मारणार्‍या अमिताभ यांनी लाखो लोकांच्‍या मनाचा ताबा घेतला.

छोट्‍या पडद्‍यावर 'देवी और सज्‍जनो आज हम खेलते है…कौन बनेगा करोडपती' असे म्‍हणत सन्‍मानपूर्वक स्‍पर्धकाला खुर्ची देतात, तेव्‍हाही त्‍याने घेतलला ताबा सुटलेला नाही.

अमिताभ यांच्या आयुष्‍यातील या गोष्टी जाणून घेऊया…

* के. ए. अब्‍बास दिग्‍दर्शित 'सात हिंदुस्‍तानी' (१९६९) हा अमिताभ बच्‍चन यांचा पहिला चित्रपट; पण, 'जंजीर' या चित्रपटाने त्‍यांना खरी ओळख मिळवून दिली.

* सुरुवातीला त्‍यांचे चित्रपट फ्‍लॉप हात असताना निर्माता-दिग्‍दर्शक कुंदनकुमार यांनी काही चित्रीकरण झाल्‍यानंतर 'दुनिया का मेला'मधून त्‍यांच्‍या जागी अभिनेता संजय खानला घेतले. मजेशीर म्‍हणजे या चित्रपटात रेखा अभिनेत्री होती.

सुरुवातीला फ्‍लॉप ठरले चित्रपट 

* HBD अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट फ्‍लॉप ठरले. तर अनेक सुपरहिट ठरले. 'यार मेरी जिंदगी' हा त्‍यांचा चित्रपट तब्‍बल २१ वर्षांनी पूर्ण झाला. 'रुद्र,' 'शिनाख्‍त,' 'बंधुआ,' 'टायगर,' 'रिश्‍ता,' 'सरफरोश अमसे' चित्रपट चालले नाहीत.

* मनमोहन देसाई दिग्‍दर्शित 'कुली'च्‍या सेटवर २६ जुलै, १९८२ रोजी मारहाण दृश्‍यात पुनीत इस्‍सारचा ठोसा चुकवण्‍याच्‍या प्रयत्‍नात अमिताभ यांच्‍या पोटात टेबलाचा  कोपरा लागला. ते बरे व्‍हावेत म्‍हणून देशभरातीलच नव्‍हे तर परदेशातीलही चाहत्‍यांनीही प्रार्थना केल्‍या.

* १९८४ साली आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करण्‍यासाठी अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश  केला. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्‍यांनी समाजवादी पक्षाचे मुरब्‍बी उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्‍हणून लोकसभेत प्रवेश केला. मात्र यानंतर 'बाेर्फोस' घाेटाळ्यामध्‍ये त्‍यांचे नाव आल्‍यानंतर त्‍यांना प्रचंड टीकेला सामाेरे जावे लागले.

* 'खुदा गवाह' (१९९२) नंतर ते काही काळ चित्रपटसृष्‍टीपासून दूर राहिले.

* अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्‍यांच्‍या ताफ्‍यात लेक्‍स, रॉल्‍स रॉईस, बीएमडब्‍ल्‍यू, मर्सिडीज आदी कारचा समावेश आहे. पांढर्‍या रंगाची रॉल्‍स रॉईस फँटम ही कार निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ यांना 'एकलव्‍य' चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्‍ट केली होती.

* अमिताभ यांचे पहिले प्रेम जया बच्‍चन किंवा रेखा नाही, तर एका ब्रिटीश कंपनीत काम करणारी मराठी मुलगी होती. दोघे कोलकात्‍यात नोकरीला होते. त्‍यावेळी अमिताभ यांना १५०० रुपये, तर त्‍या मुलीला ४०० रुपये पगार होता. बिग बींना तिच्‍याशी विवाहदेखील करायचा होता; पण ते शक्‍य झालं नाही. त्‍यामुळे बिग बी नोकरी सोडून मुंबईला आले.

बिग बींच्या चित्रपटांचे दक्षिणेतही रिमेक 

*  अमिताभ यांच्‍या 'डॉन,' 'अग्‍निपथ,' 'जंजीर' या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. दक्षिणेत 'दीवार,' 'नसीब,' 'अमर अकबर अँथनी,' 'जंजीर,' 'कस्‍मे वादे' या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. या प्रत्‍येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका साकारलेली होती. अमिताभ यांच्‍या २० चित्रपटांत त्‍यांचे नाव विजय असे आहे.

* 'डॉन,' 'दी ग्रेट गॅम्‍बलर,' 'आखरी रास्‍ता,' 'देशप्रेम,' 'अदालत,' 'सत्ते पे सत्ता,' 'कस्‍मे वादे' अशा चित्रपटांतूत त्‍यांनी दुहेरी भूमिका केल्‍या आहेत. महान चित्रपटांत तिहेरी भूमिका होती.

* अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत. 'मि. नटवरलाल'मधील 'मेरे पास आवो मेरे दोस्‍तो,' 'लावारीस'मधील मेरे अंगने मे, 'सिलसिला'मधील 'निला आसमा सो गया' आणि 'रंग बरसे' ही काही उदाहरणे आहेत.

* कारकिर्दीच्‍या उत्तरार्धात अमिताभ यांना अनेक चांगल्‍या भूमिका मिळाल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी गेटअपही बदलला. 'पा' चित्रपटातील आजारग्रस्‍त लहान मुलाची भूमिका हे सर्वोत्तम उदाहरण.

* बॉलीवूडमधील आपल्‍या दुसर्‍या इनिंगमध्‍ये अमिताभ बच्चन यांनी 'बागबान,' 'बाबू,' 'आँखे,' 'पीकू,' 'पिंक,' 'वजीर', 'शमिताभ', 'पा', '१०२ नॉट आऊट'  आदी चित्रपटातही वेगळ्‍या भूमिका केल्‍या.

* त्‍यांनी अनेक चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भूमिका केली. त्‍यांना अँग्री यंग मॅन हा किताब मिळवून देणार्‍या 'जंजीर' या चित्रपटातही ते पोलिस अधिकारी होते. त्‍याशिवाय, 'दोस्‍ताना,' 'दी ग्रेट गॅम्‍बलर,' 'अकेला,' 'आखरी रास्‍ता' अशा अनेक चित्रपटात ते पोलिस अधिकारी होते.

* राजेश खन्‍ना, संजीवकुमार अशा अनेक दिग्‍गजांसोबत अमिताभ यांनी काम केले. 'शक्‍ती' या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्‍यासोबत त्‍यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली.

* 'कौन बनेगा करोडपती'मधून अमिताभ यांनी २००० साली छोट्‍या पडद्‍यावर पदार्पण केले. यंदा या शोचे ११ वा सीझन सुरू आहे.

उंची, आवाजामुळे नाकारले गेले…

* आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासियत. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्‍टारची वैशिष्‍ट्‍ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्‍यांची हेटाळणी झाली.

* अमिताभ कार्पोरेशन या लिमिटेड संस्‍थेद्‍वारे आणि स्‍वतंत्रपणे त्‍यांनी चित्रपटांची निर्मिती केली. त्‍यात 'तेरे मेरे सपने,' 'मृत्‍युदंड,' 'उल्‍लासम,' 'सात रंग के सपने,' 'फॅमिली,' 'पा,' 'विहीर,' 'अंतरमहाल,' 'अक्‍स,' 'विरुध्‍द,' 'सप्‍तबदी,' 'बुढ्‍ढा होगा तेरा बाप,' 'मेजरसाब,' 'शमिताभ' या चित्रपटांची निर्मिती केली.

* HBD अमिताभ बच्चन यांना स्‍वत:लाच विनोदाची जबरदस्‍त जाण असल्‍याने आणि 'अमर अकबर ॲन्‍थनी'मध्‍ये आरशासमोर त्‍यांनी केलेल्‍या धमाल प्रसंगानंतर त्‍यांना वारंवार विनोदी प्रसंग दिले जाऊ लागले. शशी कपूर, विनोद खन्‍ना यांच्‍यासोबत त्‍यांची जमलेली जोडी व त्‍यांनी एकत्र केलेले चित्रपट हाही चर्चेचा विषय बनत असे.

* अनेक चित्रपटांत त्‍यांचा आवाज वापरण्‍यात आला आहे.

* 'महाभारत मालिका,' 'जोधा अकबर,' 'लगान,' 'बालिका वधू,' 'तेरे मेरे सपने,' 'परिणीता,' 'कहानी,' 'क्रिश ३,' 'कोचड्‍यान,' 'द गाझी ॲटॅक' हे चित्रपट आणि मालिकांचे कथन किंवा निवेदन केले आहे.

* अलाहाबादमधील क्रीडा संकुल,, इटावा येथील सरकारी शाळा यांना अमिताभ यांचे नाव देण्‍यात आले आहे. अलाहाबादमधील एक रस्‍ताही त्‍यांच्‍या नावाने आहे.

* अमिताभ यांना आतापर्यंत चार राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाले असून, हा एक विक्रमच आहे. अग्‍निपथ (२०००), ब्‍लॅक (२००५), पा (२००९), पिकू (२०१५) या चित्रपटांसाठी त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला आहे.

सर्वोच्च सन्मानाचे मानकरी 

* १९८४ साली पद्‍मश्री, २००१ साली पद्‍मभूषण तर २०१५ साली पद्‍मविभूषणने त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं आहे. २००७ साली फ्रान्‍स सरकारने त्‍यांना नाईट ऑफ दी लेजिओन हा सन्‍मान बहाल केला. आतापर्यंत २२० वेगवेगळे पुरस्‍कार, ७ वेगवेगळ्‍या विद्‍यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्‍यांचा सन्‍मान केला आहे. अमिताभ यांचे खास वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे ते दोन्‍ही हातांनी लिहू शकतात.

* 'खुदा गवाह'च्‍या शूटिंगच्‍या वेळी अफगाणिस्‍तानच्‍या अध्‍यक्षांनी अमिताभ यांना वायुसेनेची खास सुरक्षा दिली होती. अफगाणमध्‍ये सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्‍हणून 'खुदा गवाह'ची नोंद आहे.

* गाड्‍यांबरोबरच त्‍यांना घड्‍याळे जमा करण्‍याचा छंद आहे. लंडन आणि स्‍वित्‍झर्लंड ही त्‍यांची आवडती ठिकाणे आहेत.

* अमिताभ यांनी पहिली कविता १९८२ मध्‍ये रुग्‍णालयात असताना लिहिली.

* बॉलिवूडमधील मेड फॉर इच अदर जोड्‍यांमध्‍ये अमिताभ आणि जया बच्‍चन या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. पडद्‍यावर या जोडीने एकत्र काम केले. ३ जून १९९३ रोजी खर्‍या आयुष्‍यातही त्‍यांनी एकमेकांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला.

या लक्षवेधी नोंदी तुम्हाला माहितीये का?

* घरातील बेडरूम ही त्‍यांची आवडती जागा. येथे शांतपणे बसून त्‍यांना वाचन करणे आवडते. ते कधीही चहा, कॉफी घेत नाहीत. मद्‍यपी व्‍यक्‍तीचा उत्तम अभिनय करणारे अमिताभ दारूला हातदेखील लावत नाहीत.

* ते फारसे चिडत नाहीत. रस्‍त्‍यावरची भुर्जी, भाजलेले कणीस त्‍यांना आवडते. हिंदीशिवाय ते मराठी, बंगाली, पंजाबी भाषा बोलू शकतात. जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन या विदेशी भाषाही त्‍यांनी शिकल्‍या आहेत.

* ६ फूट २ इंच असलेले अमिताभ बॉलिवूडमधले सर्वांत उंच अभिनेते आहेत. मुंबईत स्‍ट्रगल करताना राहण्‍यासाठी जागा नसल्‍याने त्‍यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्‍हवर काढल्‍या हाेत्‍या.

* वृत्त निवेदक म्‍हणून त्‍यांनी आकाशवाणीत अर्ज केला, मात्र, आवाज चांगला नसल्‍याने त्‍यांना ही नोकरी मिळाली नाही.

* लंडन येथे २०१२ मध्‍ये झालेल्‍या ऑलिम्‍पिकमध्‍ये मशाल धावकाचा मान त्‍यांना मिळाला होता.

* त्‍यांच्‍या मते, वहिदा रहमानच ही हिंदी सिनेसृष्‍टीतील सर्वात सुदंर अभिनेत्री आहे.

* लंडनच्‍या मादाम तुसाद संग्रहालयात २००१ मध्‍ये मेणाचा पुतळा उभारण्‍यात आला आहे.

* रेखा, परवीन बॉबी आणि झीनत अमान या नायिकांनी बिग बींसोबत काम केले आहे. सायरा बानो (हेराफेरी, १९७६), मुमताज (बंधे हाथ, १९७३), नूतन (सौदागर, १९७३), रती अग्‍निहोत्री (कुली, १९८३) यांनी फक्‍त एकाच चित्रपटात अमिताभसमवेत काम केले आहे.

* 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटामध्‍ये काम करताना त्‍यांनी लेन्‍सचा वापर केला होता. या लेन्‍स घालताना आणि काढताना त्‍यांना प्रचंड त्रास होत असे.

* सुमारे १८ चित्रपटांत अमिताभ यांचा मृत्‍यू दाखवण्‍यात आला आहे.

* अमिताभ आणि आमीर खान 'ठग्‍ज ऑफ हिंदोस्‍तान'मधून पहिल्‍यांदाच एकत्र दिसले.

* १९७८ साली एकाच महिन्‍यात अमिताभ यांचे 'त्रिशुल,' 'डॉन,' 'कस्‍मे वादे,' 'बेईमान' चित्रपट रिलीज झाले होते.

* बिग बींना बॉलिवूड हा शब्‍द आवडत नाही. ते नेहमी हिंदी फिल्‍म इंडस्‍ट्री या शब्‍दाचा वापर करतात.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news