पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून कीर्तीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनत्री समृद्धी केळकर (Samruddhi kelakar) लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Samruddhi kelakar)
नव्या वर्षात हे नवं आव्हान स्वीकारताना समृद्धी म्हणाली, 'मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला संभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे. माझ्या करिअरची सुरुवात अश्याच एका डान्स रिॲलिटी शोने झाली होती. रिॲलिटी शोमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. नृत्यावरचं माझं प्रेम सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मंच खूपच खास आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे.'