पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट आज (दि.25) देशभरातील 5 हजार 200 चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ शाहरुखच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी दुपारी 3 पर्यंत 20.35 कोटी इतकी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 50 कोटी कलेक्शनचा आकडा पार करेल, असा दावा ट्रेड एक्सपर्टंनी केला आहे.
'पठाण' आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचे दर्शन मोठ्या पडद्यावर चाहत्यांना घडले आहे. ट्रेड एक्सपर्टने पठानच्या कलेक्शन बाबत मोठा दावा केला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी ५० कोटींचा टप्पा पार करू शकतो. तसेच कन्नड चित्रपट KGF 2 (53.9 कोटी), हृतिक रोशनचा वॉर (53.3 कोटी) चित्रपटांना टक्कर देईल असाही दावा आहे. दरम्यान, चित्रपटाने दुपारी 3 पर्यंत PVR : 9.40 कोटी, INOX : 7.05 कोटी, सिनेपोलिस : 3.90 कोटी असा एकुण 20.35 कोटी कलेक्शन केले आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने आज मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केली. 'पठाण' या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगही दमदार झाली आहे. पठाणने रिलीज होण्यापूर्वी 32 कोटी रुपयांची तिकिटे विकली होती. आज सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रचंड गर्दी होती. तरण आदर्शसह अनेक चित्रपट समीक्षकांनी पठाणला 4.5 स्टार रेटिंग दिले आहे. 26 जानेवारीची सुट्टी आणि त्यानंतर येणाऱ्या वीकेंडमध्ये चित्रपट कलेक्शनमध्ये मोठी झेप घेऊ शकतो. वीकेंडपर्यंत हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत पठाणने बुधवारी सकाळी रिलीज होण्याच्या दोन तास आधीच बाहुबली 2 ला मागे टाकले होते.
बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील शाहरुख खानच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'पठाण हा केवळ एक चित्रपट नसून ती एक भावना आहे' असे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शाहरुखच्या चाहत्यांसाठी 'पठाण' रिलीज होणे हे एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. मुंबईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मुंबईतील गेटी गॅलेक्सी बाहेर ढोल-ताशे वाजवत चाहते पठाणच्या रिलीजचा आनंद साजरा करत आहेत.