Telugu superstar Krishna | दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबूचे वडील तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांचे निधन

Telugu superstar Krishna | दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबूचे वडील तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांचे निधन

Published on

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन; दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबू यांचे वडील तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी (दि.१५) ७९ व्या वर्षी निधन झाले. तेलुगू सुपरस्टार घटामनेनी शिव रामा कृष्णमूर्ती असे त्यांचे नाव असून ते कृष्णा या नावाने प्रसिद्ध होते. सोमवारी पहाटे कृष्णा (Telugu superstar Krishna) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कॉन्टिनेंटल रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते की, कृष्णा यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते आणि २० मिनिटांच्या सीपीआरनंतर ते पुन्हा शुद्धीवर आले होते. नंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आणि त्यांना तेथे जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन कंपनीचे प्रमुख म्हणून पाच दशकांपासून तेलुगू चित्रपट उद्योगात योगदान देणाऱ्या कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या कृष्णा यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक संदेशात म्हटले आहे. अभिनेते चिरंजीवी आणि नानी यांनीही कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कृष्णा यांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीस तेलुगू चित्रपटांतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि लवकरच त्यांनी प्रसिद्ध अभिनेते म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांनी तेलुगू चित्रपट उद्योगात सर्वोच्च स्थान कायम ठेवले. ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपट केले. गुडाचारी ११६, मांची कुटुंबम, लक्ष्मी निवासम, विचित्र कुटुंबम, देवदासू, भाले कृष्णुडू, गुरु शिश्युलू हे कृष्णा यांचे चित्रपट सर्वाधिक हिट ठरले. (Telugu superstar Krishna)

कृष्णा यांची दोन लग्ने झाली होती. त्यांची पहिली पत्नी इंदिरा होती, तिच्यापासून त्यांना रमेश बाबू, महेश बाबू, पद्मावती, मंजुळा आणि प्रियदर्शनी ही पाच मुले आहेत. त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री- चित्रपट निर्मात्या विजया निर्मला होत्या. यावर्षी २८ सप्टेंबर रोजी इंदिरा यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. तर जानेवारीमध्ये किडनीच्या आजारामुळे रमेश यांचे निधन झाले होते.

महेश बाबू याने वडील कृष्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवत तेलुगू चित्रपटसृष्टीत यश मिळवले आहे. स्वत:च्या गुणवत्तेवर महेशबाबू तेलुगू सिनेमातील सर्वात मोठा स्टार बनला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news