सलमान खानच्या अपीलाचा निकाल रखडला | पुढारी

सलमान खानच्या अपीलाचा निकाल रखडला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सलमान खानने पनवेलच्या फार्म हाऊसजवळील शेजार्‍या विरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

पनवेल येथील त्याच्या फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कॅड यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करावे आणि तात्काळ हटवून टाकावे, असे अंतरिम निर्देश देण्याची विनंती करत सलमानने दिवाणी न्यायालयात याचिकेतून केली होती.

सदर व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करताना ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमानने प्रतिवादी केले होते. मात्र, न्यायालयाने सलमानची मागणी फेटाळून लावली. त्या निर्णायाला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

न्यायमूर्ती भडंग शुक्रवारी सेवानिवृत्त होणार असल्याने गुरुवारी याचिका बोर्डावर ठेवण्यात आली होती. आज निकाल लागेल अशी शक्यता होती. मात्र अंतिम निकालपत्र पूर्ण झालेले नाही. आपण शुक्रवारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे 8 नोव्हेंबरनंतर दुसरे न्यायमूर्ती निकाल जाहीर करतील, असे न्या. भडंग यांनी स्पष्ट केले.

Back to top button