या पॅन इंडिया चित्रपटांची प्रतीक्षा | पुढारी

या पॅन इंडिया चित्रपटांची प्रतीक्षा

बॉलीवूडमध्ये सध्या जर कुणी ‘क्या चल रहा है?’ असे विचारले तर ‘फ्लॉप चल रहा है..’ असे उत्तर मिळते. आमीर खानचा महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाला. बॉयकॉट ट्रेंडचा त्यात हातभार असला तरी चित्रपटात दम नव्हता. अनेकांना ‘फॉरेस्ट गम्प’चा हा सोयीने बनवलेला हा रिमेक रूचला नाही. अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ही फ्लॉप झाला. त्या आधी रणबीर कपूरचा ‘शमशेरा’फ्लॉप झाला होता. साऊथचे चित्रपट मात्र अजूनही तिकिटबारीवर दणक्यात यश मिळवत आहेत. ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटाच्या कमाईने ‘लाल सिंग चड्ढा’ला खूप मागे टाकले आहे. यापूर्वी ‘केजीएफ 2’ आणि ‘आरआरआर’ या पॅन इंडिया चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक गल्ला कमावला. आगामी काळातही काही पॅन इंडिया चित्रपट अशीच मोठी कमाई करण्याची शक्यता आहे. त्याविषयी…

पुष्पा : द रूल

2021 च्या अखेरीस आलेल्या ‘पुष्पा’ या अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाने देशभरात यश मिळवले. या चित्रपटाने 350 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा ः रूल’बाबत मोठी उत्सुकता आहे.

सालार

‘केजीएफ’या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘सालार’ 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. यात प्रभास आणि श्रृती हसन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपटही कदाचित दोन भागात येऊ शकतो. ‘राधेश्याम’च्या अपयशानतंर प्रभासला ‘सालार’बाबत आशा आहे.

आदिपुरुष

रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पॅन इंडिया रीलिज होणार आहे. पौराणिक कथानक, स्पेशल इफेक्टस् यामुळे या चित्रपटाबाबत उत्सुकता
आहे.

पीएस : 1

ऐश्वर्या राय अभिनीत या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. हा चित्रपट दोन भागात येत आहे. ओरछा येथील 16 व्या आणि 17 व्या शतकातील महाल आणि मंदिरात याचे शूटिंग झाले आहे. या चित्रपटाच्या कमाईबाबतही मोठी उत्सुकता आहे.

आरसी 15

‘आरआरआर’मधील तगड्या भूमिकेनंतर रामचरण ‘आरसी 15’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे हे तात्पुरते नाव आहे. यात त्याच्यासोबत कियारा आडवाणी आहे. हा चित्रपटही बिग बजेट असून पॅन इंडिया रीलिज केला जाईल.

Back to top button