ऐन प्रपोज करण्याच्या वेळी कुणाल अंगठी विसरतो तेव्हा…… सोनाली कुलकर्णीने शेअर केला धमाल किस्सा | पुढारी

ऐन प्रपोज करण्याच्या वेळी कुणाल अंगठी विसरतो तेव्हा...... सोनाली कुलकर्णीने शेअर केला धमाल किस्सा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर भलतीच ॲक्टिव असते. तिच्या आगामी सिनेमाबाबत, आयुष्यातील घडामोडींबाबत ती चाहत्यांशी शेअर करताना दिसते. आताही तिने तिची वेडिंग स्टोरी चाहत्यांशी शेअर केली आहे. खरं तर लॉकडाउनमध्ये सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांमध्ये पार पडला  होता. त्यामुळे सोनालीचे चाहते ही काहीसे हिरमुसले होते. पण सोनालीने तिच्या लग्नाची स्टोरी ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी चॅनेलसोबत चाहत्यांशी शेअर केली आहे.

तर सोनालीने लग्न ठरण्यापूर्वीपासूनचे सोहळ्यापर्यंतची धमाल चाहत्यांशी शेअर केली आहे. एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने या दोघांची भेट झाली. लंडनमध्ये एकदा भेटल्यानंतर कुणाल दुबईला शिफ्ट झाला. यावेळी सोनाली आणि कुणाल सतत भेटू लागले. याच दरम्यान कुणालच्या प्रपोजलचा किस्सा शेअर केला आहे. सोनाली म्हणते, मी कुणालला धमकी वजा सांगितलं होत की, तू आता या भेटीनंतर नातं ऑफिशियल केलं नाहीस तर  मला तुला भेटता येणार नाही.’

यानंतर कुणाल सोनालीला दुबईच्या सगळ्यात उंचीवरच्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. पण यावेळीही सोनालीचा अपेक्षाभंग झाला आणि त्याने तिला प्रपोज केलं नाही. पुढे याबाबत सांगताना सोनाली म्हणते, ‘दुसऱ्या दिवशी माझी भारतात येणार होते. सकाळी निघताना मी त्याच्याकडे काहीसं कोरडेपणाने पाहिलं आणि त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते.

अचानक कुणालने मला आतून हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? हे विचारलं. त्यानंतर मी पुन्हा आत गेले त्यावेळी कुणालने माझ्या आवडीचं गाणं लावलं. त्याने मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. यावर मी त्याला विचारलं की तू हे काल का नाही केलं. त्यावर तो मला म्हणला की मी कालच तुला प्रपोज करणार होतो पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो.’  अर्थातच सोनालीने त्याच्या या विसरभोळेपणाला माफ केलं असेल यात शंका नाही.

Back to top button