मनोरंजनासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' सज्ज : अक्षय बर्दापूरकर | पुढारी

मनोरंजनासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' सज्ज : अक्षय बर्दापूरकर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : २०२० मध्ये लॉकडाऊन असल्याने बरेचसे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. सुदैवाने एबी आणि सीडी चित्रपटाचे डिजिटल राईट्स २०१९ मध्येच विकले गेले. आता मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ सज्ज आहे, असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले. गेल्या वर्षीच्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचा खूप बारकाईने अभ्यास करत होती. आता संपूर्ण तयारीसह ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हे ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ पूर्णपणे सज्ज झाले आहे, असेही ते म्‍हणाले.

एबी आणि सीडी चित्रपट लॉकडाऊन दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला. तेव्हा मला ओटीटीची ताकद लक्षात आली. याच काळात मला पुष्कर श्रोत्रीचा फोन आला होता. आम्ही बराच वेळ डिजिटल प्लॅटफॉर्म, मराठी मनोरंजन क्षेत्राचे भवितव्य याविषयी बोलत होतो.

त्यानंतर मराठी ओटीटी उदयास येऊ लागले. त्यानंतर अनेक झूम मीटिंग्सही झाल्या.

हळूहळू अनेक नामांकित लोक जोडले गेले. मग अखेर पहिलेवहिले मराठी ओटीटी नावारूपास आले.

 

Akshay Bardapurkar
अक्षय बर्दापूरकर

वेगळेपण काय ?

प्लॅनेट मराठी ओटीटी हा संपूर्णपणे मराठीला वाहिलेला पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. ३१ ऑगस्ट रोजी तब्बल पाच वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

वेबफिल्म, वेबसीरिजसह शॉर्टफिल्म्स, कराओके, टॉक शोज, कॉन्सर्ट असे अनेक मनोरंजनाचे प्रकार ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर उपलब्ध होणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या मनोरंजनाचा विचार यात करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे हे सर्व मराठीत हे पहिल्यांदाच घडत आहे. या ओटीटीवर नुकताच ‘जून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मिळणारा प्रतिसाद कसा होता?

‘जून’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ‘जून’ चित्रपट पाहिला तेव्हाच मला त्याचा विषय खूप आवडला होता. वडील मुलाचे नाते, मैत्रीचे नाते, औरंगाबाद शहर या सर्व गोष्टी मला खूप भावल्या.

मी ही मूळचा औरंगाबादचाच आहे. त्यामुळे चित्रपटातील औरंगाबाद शहर मला खुणावत होते. ‘जून’ चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ दोन महिनेच उलटून गेले आहेत. तब्बल २ लाख लोकांपर्यंत ‘जून’ पोहोचला आहे.

पाच वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार 

‘सोप्पं नसतं काही’, ‘जॉबलेस’, ‘हिंग पुस्तक तलवार’, ‘परीस’ आणि ‘बाप बीप बाप’ अशा पाच वेबसिरीज एकाचवेळी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

सगळ्या वेब सीरीजचे विषय पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार यात शंका नाही. ‘सोप्पं नसतं काही’ ही ‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेवर आधारित आहे.

जॉब नसलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीचे आणि मनस्थितीचे चित्रण ‘जॉबलेस’ मध्ये पाहावयास मिळणार आहे.

‘हिंग पुस्तक तलवार’ ही तरुणाईवर आधारित धमाल मस्ती आणि खळखळून हसवणारी विनोदी वेबसिरीज आहे.

तर ‘बाप बीप बाप’ ही वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित असून ‘परिस’ ही ग्रामीण जीवनावर आधारित वेबसिरीज असणार आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार असणार आहेत. नवोदित कलाकारही या वेबसिरीजमधून पाहावयास मिळणार आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button