महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा लोकमहोत्सव | पुढारी

महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा लोकमहोत्सव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा 22 वा लोकमहोत्सव 4 ते 6 जुलै या कालावधीत परेल येथील दामोदर नाट्यगृहात होत आहे. यंदाच्या महोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणी, गीतकार किशोर कदम (सौमित्र), शाहीर नंदेश उमप, दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेते प्रसाद ओक यांना शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणर आहे.

लोकमहोत्सवाचा आरंभ 4 जुलै रोजी डॉक्टर राजेंद्र जाधव लिखित ’लावण्य जलसा’ या बहारदार लावण्यांनी होणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री वर्षा संगमनेर, विजया पालव, अमिता कदम, उर्मिता डेव्हिड या नृत्यांगनांचा सहभाग आहे. 5 जुलै रोजी प्रतिथयश संगीतकार देवदत्त साबळे यांच्या 50 वर्षातील गाजलेल्या लोकप्रिय गाण्याचा संगीतमयी मागोवा घेण्यात येईल.

महोत्सवाची सांगता 6 जुलै रोजी शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सोहळ्याने होईल. अभिनेता पराग चौधरी हा दादा कोंडके यांचा अभिनय सोंगाड्या या कार्यक्रमाद्वारे पेश करुन शाहीर कोंडके यांच्या स्मृतींना उजाळा देतील.

मराठी विनोदी चित्रपटाचे प्रेरणास्थान ठरलेल्या दादा कोंडके यांचा स्मृती सोहळा दरवर्षी त्यांच्या भगिनी लिलाबाई मोरे यांच्या प्ररणेने साजरा केला जातो. शाहीर दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे आणि माणिक पदमाकर मोरे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

लोकमहोत्सवाची संकल्पना सायली परब यांची आहे. संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव आणि विश्वस्त अशोक सावंत, मानद विश्वस्त बाळा खोपडे, विश्वस्त डॉ. सुनील हळूरकर, कलावंत प्रतिनिधी राजू शेरवाडे यांच्या प्रयत्नातून हा महोत्सव साकारला जात आहे. मोफत प्रवेशिकांसाठी 9821915500/9322381885 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजनकांनी केले आहे.

Back to top button