देवमाणूस पुन्हा वाड्यावर परतणार; दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली? | पुढारी

देवमाणूस पुन्हा वाड्यावर परतणार; दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टीव्हीवरील क्राईम थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण देवमाणूस मालिकेचा शेवट ज्याप्रकारे केला आहे त्यामुळे प्रेक्षक गोंधळात पडले. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये देवमाणूस डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आलेला दाखविण्यात आला नाही. एकूणच या मालिकेचा शेवट अर्धवट दाखविण्यात आला. यामुळे या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसे संकेत या मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने दिले आहेत.

”आपल्या सर्वांची लाडकी मालिका ‘देवमाणूस’ आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्यासाठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू पण तोपर्यंत तुमचं असचं प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती.” असे श्वेता शिंदे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

देवमाणूसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये डॉक्टरच्या डोक्यात चंदा दगड घालते. तर चंदाला डिंपल मारते. पण शेवटी डॉक्टरचा मृत्यू काही होत नाही. आणि त्याला शिक्षा देखील झालेली नाही.

देवमाणूस मालिकेचे ३०० एपिसोड दाखवण्यात आले. पण पैसे आणि दागिन्यांसाठी एकामागून एक खून करणाऱ्या देवमाणूस डॉक्टराला काही शिक्षा झालेली दाखविण्यात आलेली नाही. यामुळे प्रेक्षक गोंधळात पडल्याचे दिसून आले. तशा प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

ही लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. देवमाणूस मालिकेत बोगस डॉक्टरचे भयानक कारनामे दाखवण्यात आले आहेत.

अभिनेता किरण गायकवाड याची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. यातील सरू आज्जी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी दमदार अभिनय केला आहे.

काय म्हणते श्वेता शिंदे?

१६ ऑगस्ट २०२० ला ऐन पॅनडामिकमध्ये वज्र प्रोडक्शन्स निर्मित ‘देवमाणूस’ या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक वर्ष सरलं… गेले एक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. रात्री १०:३० च्या स्लॉट ला असून सुद्धा सर्व मराठी मालिकांमध्ये नंबर वन राहण्याचा इतिहास या मालिकेने रचला ते केवळ मालिकेवर असीम प्रेम करणाऱ्या आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे. यासाठी आपले सर्वांचे शतशः आभार.

‘लागिर झालं जी’ मधील भैय्यासाहेब असो वा ‘देवमाणूस’ मधील देवीसिंग उर्फ अजित कुमार देव किरण तू नेहमीच माझ्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक भूमिका अगदी उत्तम सकरलीस. सरू आजी आणि टोन्या मुळे तर जणू memes ची बरसातच झाली. इतकेच नव्हे डिंपल व तिचे आई-बाबा, वंदी आत्या, लाला, बज्या, नाम्या, दीपा, विजय, रेश्मा, अपर्णा, मंजुळा, दिव्या सिंग, आर्या देशमुख आणि आता नव्याने आलेली कोल्हापुरी मिरची म्हणजेच चंदा सर्वांनीच शेरास सव्वाशेर अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

विशेष म्हणजे इतकी पात्र मालिकेत येत-जात असूनही प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आपली एक वेगळी छाप उमटवत होत. सर्वच कलाकारांच्या दमदार अभिनयाला साथ मिळाली ती दिग्दर्शक राजू सावंत यांच्या दिग्दर्शनाची व स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम यांच्या लेखणीची. यांच्यामुळे अगदी सध्या ‘Beautiful’ शब्दापासून ते सरू आजीच्या गोड बोलीपर्यंत एकूण-एक डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीचा भाग ठरले. तसेच वज्र प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम आणि तंत्रज्ञ यांच्या अढळ पाठिंब्यामुळेच ‘देवमाणूस’ मालिकेचा हा इतका लांबचा पल्ला गाठणं शक्य झालं.

आपल्या सर्वांची लाडकी मालिका “देवमाणूस “आज आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्या साठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू पण तोपर्यंत तुमचं असच प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती.

हे ही वाचा :

 

Back to top button