रियाचा भाऊ, सुशांतचा मॅनेजर अटकेत! | पुढारी

रियाचा भाऊ, सुशांतचा मॅनेजर अटकेत!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पूर्णपणे मादक पदार्थांच्या तस्करीभोवती फिरू लागला असून, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोवीक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी बेड्या ठोकल्या. दोघांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली.

एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने रियाच्या घराचीही झडती घेतली. या झडतीचा तपशील हाती आलेला नाही. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी तपास करत आहे.

एनसीबीने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा व अन्य अमली विकणार्‍या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार ड्रग्ज डीलर अटक केली आहे. या चौघांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि मिरांडा याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनसीबीच्या सहा जणांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी दोघांच्याही घरावर छापे टाकले.

एनसीबीने शोविक आणि मिरांडा या दोघांनाही ताब्यात घेत अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 67 अन्वये नोटिसा बजावल्या होत्या. दिवसभराच्या चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली. 

शोविकच्या सांगण्यावरून मिरांडाची ड्रग्ज खरेदी

एनसीबीने याचप्रकरणात अटक केलेल्या अब्दुल बासित परिहार याला न्यायालयाने 09 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवले आहे. परिहार याचेही मिरांडाशी संबंध समोर आले आहेत. मिरांडा हा रियाचा जवळचा सहकारी होता. त्याने शोविकच्या सूचनेनुसार ड्रग्स खरेदी केल्याचे स्पष्ट होत आहे.

शोवीकची कबुली

शोवीक याचे मार्च 2020 मधील आणखी एक चॅट समोर आले असून यात त्याने ड्रग्ज डीलर विलात्राचा नंबर मिरांडाला देत, 5 ग्रॅमसाठी 10 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर मिरांडाने विलात्रांशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्याचे कॉलवरूनही बोलणे झाले. या संदर्भात झालेल्या चौकशीत शोवीकने ड्रग्जची कबुली दिल्याचे समजते.

 

Back to top button