संजय राऊतांनी कंगनावर डागली तोफ! म्हणाले... | पुढारी

संजय राऊतांनी कंगनावर डागली तोफ! म्हणाले...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. मेरे हिंमत को परखने की गुस्ताखी न करना… पहले भी कई तूफानों का रूख मोड चुका हूँ, अशा शब्दांत खा. राऊत यांनी नामोल्लेख टाळत कंगनावर टीकास्त्र सोडले आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? अशी ट्विटवरून टीप्पणी केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात वाद पेटला. शिवसेना खा. संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात तर ट्विटरवरून शाब्दीक चकमकी झडताना दिसत आहे.

खा. राऊत यांनी आज (दि. ६) सकाळी एक ट्विट करून कंगनाला पुन्हा शायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यांनी ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,’ असे ट्विट करून पुन्हा एकदा नाव न घेता कंगना व तिच्या समर्थनातील लोकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही कंगनाला खडेबोल सुनावत तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. यानंतर संतापलेल्या कंगनाने मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कुणाची हिम्मत असेल तर थांबबून दाखवा, असे खुले आव्हान केले. तिच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कंगना राणावतवर जोरदार टीका केली. 

मुंबई कुणाच्या बापाची नाही. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. हिंमत असेल रोखून दाखवा, असे कंगनाने म्हटले होते. तिच्या या आव्हानाला खा. राऊत यांनी ट्विटमधून प्रत्युत्तर दिले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे. 

Back to top button