सुशांतच्या घरातच ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य | पुढारी

सुशांतच्या घरातच ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सुशांतचा घरातला मदतनीस दीपेश सावंत हा मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेटचा सक्रिय सदस्य असून, मायानगरीतील उच्चभ्रू मंडळी आणि ड्रग्ज तस्कर यांच्याशी त्याचे थेट संबंध असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी सांगितले. 

दीपेश सावंतने दिलेला जबाब आणि हाती आलेल्या तांत्रिक पुराव्यानुसार दीपेश ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचे सिद्ध होते. दीपेश सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. 17 मार्च 2020 रोजी शोवीक चक्रवर्तीच्या सांगण्यावरून दीपेशने सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचे घर गाठले आणि वांद्य्रातील झैदकडून 5 ग्रॅम गांजाची डिलिव्हरी घेतली. 17 एप्रिल रोजी रिया आणि शोवीक यांनी त्याला कैझनकडून 10 ग्रॅम चरसची डिलिव्हरी घेण्यास सांगितले. सुशांतच्या घराजवळच  हे चरस त्याने स्वीकारले. 1 मे रोजी शोविकने दीपेशला ड्वायने नावाच्या ग्रहस्थाकडून गांजा घेण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी ही ऑर्डर त्याच्या हाती पडली. जूनच्या पहिल्या आठवड्यातही ऋषीकेश पवार नावाच्या व्यक्तीकडून दीपेशने 100 ग्रॅम गांजा घेतल्याचे एनसीबीने सांगितले. 

दीपेशच्या जबाबामुळे ड्रग्ज खरेदी प्रकरणी रिया आणि शोविक चक्रवर्तीची कसून चौकशी सुरू असून, शोविकला गजाआड केले आता रियाला कधी अटक होते याकडेच सर्वांचे लक्ष आहे. 

आणखी एक ड्रॅग्ज डीलर ताब्यात

दरम्यान, एनसीबीने छापेमारी करत ड्रग्ज जप्त करत अनुज केसवानी याला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी अटक केलेल्या कैझन इब्राहिम याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने अटक केली.

एनसीबीने टाकलेल्या  छाप्यात अनुज केसवानीकडे 590 ग्रॅम हशीश, 0.64 ग्रॅम एलएसडी, 404 ग्रॅम आयात झालेल्या उच्चप्रतीचा गांजा आणि कॅप्सूल, 1 लाख 85 हजार 200 रुपये रोख रक्कम आणि 5 हजार इंडोनेशियन रुपीया जप्त केला आहे. केसवानी हा सुद्धा एक ड्रग्ज डीलर आहे. त्याच्याकडे सापडलेल्या एलएसडीचे प्रमाण हे अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत व्यावसायिक समजले जाते. 

एनसीबीने बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा व अन्य अंमली विकणार्‍या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा, बसीत परिहार आणि कैनाझ इब्राहीम या पाच ड्रग्ज डीलर्सना अटक केली आहे. यातील कैनाझ याच्या चौकशीतून केसवानी याचे नाव समोर आले.

Back to top button