औषधाच्या सेवनांनंतर ५ दिवसांत सुशांतचा मृत्यू? बहिणींविरोधात रियाची पोलिसांत तक्रार (video) | पुढारी

औषधाच्या सेवनांनंतर ५ दिवसांत सुशांतचा मृत्यू? बहिणींविरोधात रियाची पोलिसांत तक्रार (video)

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडतच आहेत. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी सुशांतची बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह यांच्यासह राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. तरूण कुमार आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७४, ३०६, १२०B आणि ३४ यासह अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम ८(c), २१, २२(A), २९ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतला त्याची बहिणी प्रियंका हिने ८ जून रोजी राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरूण कुमार यांच्याकडून बनावट प्रिस्क्रिप्शन घेऊन पाठवले होते. या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधांची नावे होती, जी अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्यांना बंदी आहे. प्रियंकाच्या सांगण्यावरून सुशांतने घेतलेली हिच औषधे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत रियाने वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत वांद्रे पोलिसांकडे लेखी तक्रार देत बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक आणि अंमली पदार्थ विरोधी कायदा व टेली मेडिसीन प्रॅक्टिस गाईडलाईन कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

वांद्रे पोलिसांनी सोमवारी रियाचा सविस्तर जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्त्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचेही अंबिका यांनी स्पष्ट केले आहे.

रियाने केलेल्या तक्रारीनुसार, सुशांत हा बायोपोलर आजाराने त्रस्त होता. त्यानुसार तो औषधे घेत होता. ८ जून रोजी प्रियंकाने त्याला दिल्लीतील डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार यांच्या सल्ल्यानुसार एक औषधांची चिठ्ठी पाठवत ही औषध घेण्यास सांगितले. रियाने याला विरोध केला. मात्र, सुशांतने ही ते औषध घेणार असल्याचे सांगितल्यामुळे आपल्या दोघांमध्ये वाद झाला होता, असे रियाने तक्रारीत सांगितले आहे.

रुग्णाला न तपासता त्याला औषधे देणे चुकीचे आहे. तसेच या औषधांना अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत बंदी असल्याचेही या तक्रारीत नमूद औषधांची चिठ्ठी खोटी आहे. कारण याच औषधाच्या सेवनांनंतर पाच दिवसांत सुशांतचा मृत्यू होतो. त्यामुळे या दिशेनेही सखोल तपास होणे गरजेचे असून प्रियंकासह डॉ. तरुण कुमार आणि यात सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी तिने केली आहे. 

 

Back to top button