कंगनाचे मुंबईत येण्यापूर्वी ट्विट, 'ना डरूंगी, ना झुकूँगी'

मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत येण्यास मज्जाव केल्यानंतर कंगनाने आपण मुंबईत येऊन दाखवू, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुंबईत येण्यापूर्वी एका मागोमाग एक ट्विट केले आहेत आणि मुंबई तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे तिने सांगितले आहे.
कंगनाने म्हटले आहे-‘राणी लक्ष्मीबाई यांचे साहस, शौर्य आणि बलिदान याचा मी चित्रपटाच्या माध्यमातून अनुभव घेतला आहे. दु:खाची बाब म्हणजे मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जात आहे. मी राणी लक्ष्मीबाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालेन. न घाबरेन, ना झुकेन. मी चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतच राहीन, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.’
कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘ही मुंबई माझे घर आहे, मी मानते की महाराष्ट्राने मला सर्व काही दिलं आहे. परंतु, मीदेखील महाराष्ट्राला आपली भक्ती आणि प्रेमाची अशी एक कन्या भेट दिली आहे, जी महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी आपले रक्तदेखील देऊ शकते, जय महाराष्ट्र.’
कंगनाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी बारा वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदिगड हॉस्टलमध्ये गेले. मग, दिल्लीमध्ये राहिले आणि १६ व्या वर्षी जेव्हा मुंबईत आले, तेव्हा काही मित्र म्हणाले की, मुम्बादेवीला जो आवडतो, तोच मुंबईत राहतो. आम्ही सर्व मुम्बादेवी देवीचे दर्शन करण्यासाठी गेलो. सर्व मित्र परत गेले आणि मुम्बादेवीने मला आपल्याजवळ ठेवून घेतलं.’
कंगना आणि संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकमेंकावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत विमानतळावर दाखल होणार आहे. कंगनाला केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. शिवाय करणी सेनेनेदेखील कंगनाचे समर्थन करत तिला विमानतळावरून सुरक्षित घरी पोहोचवण्याची तयारी दर्शवली आहे.