श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत कौरची याच आठवड्यात चौकशी? | पुढारी

श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत कौरची याच आठवड्यात चौकशी?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आपल्या तपासाला गती दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपास करत असताना एनसीबीची या प्रकरणात एन्ट्री झाली होती.  एनसीबी आता आणखी काही लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्याची तयारी करत आहे. सोमवारी सूत्रांनी ही माहिती दिली. या आठवड्यात एनसीबी सारा अली खान, रकुलप्रीत कौर, श्रद्धा कपूर आणि सिमोन यांना चौकशीसाठी नोटीस पाठवू शकते, असे सूत्रांनी सांगितले. अमली पदार्थ तस्करांच्या चौकशीत यांची नावे पुढे आली आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने श्रुती मोदी आणि जया शाह यांना आज नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चौकशीनंतर नवीन समन्स बजावले जाऊ शकतात.

अलीकडेच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलची चौकशी करणाऱ्या एनसीबीला मोठे यश आले. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर एनसीबीने ६ जणांना पकडले होते. बॉलिवूड ड्रग्स रॅकेटमधून या ६ जणांचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती मुख्य आहेत. दोघांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान, एनसीबीच्या पथकाने लोणावळ्यातील तो हँगआउट बंगला शोधला आहे. त्या ठिकाणी असे काही पुरावे सापडले आहेत जे नशेच्या आरोपाची पुष्टी करताना दिसून येत आहे. 

Back to top button