अभिनेत्री दीपिका पदुकोण उद्या ‘एनसीबी’समोर हजर | पुढारी

अभिनेत्री दीपिका पदुकोण उद्या ‘एनसीबी’समोर हजर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) बजावलेल्या समन्सनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सारा अली खान मुंबईत परतल्या आहेत; तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश या दोघीजणी शुक्रवारी एनसीबीसमोर चौकशीला हजर रहाणार आहेत.

एनसीबीच्या या कारवाईनंतर गोव्यामध्ये पती रणवीरसोबत शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या दीपिकाने हे शूट थांबवत मुंबई गाठली आहे. तिने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या वकिलांशी सल्लामसलत केली. दीपिकाने शनिवारी चौकशीला हजर राहणार असल्याचे एनसीबीला कळवले आहे.

सिने अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलवरून तपास करत असलेल्या एनसीबीने बॉलीवूडमधील ड्रग्जच्या काळ्या धंद्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर एनसीबीने बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासह सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह या अभिनेत्री व फॅशन डिझायनर सिमोन खंबाट्टा यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

दीपिकाप्रमाणेच गोव्यात असलेली अभिनेत्री सारा ही तिची आई अमृता सिंह आणि भावासोबत मुंबईत परतली आहे. एनसीबीने सारा आणि श्रद्धा कपूर यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. तर रकुल प्रीत सिंह ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये असल्याने ती गुरुवारी चौकशीला हजर राहू शकली नाही. ती शुक्रवारी एनसीबीसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनसीबीने सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा या दोघांकडे कसून चौकशी सुरू ठेवली आहे. एनसीबीने फॅशन डिझायनर सीमोन खंबाटा हिच्याकडे गुरुवारी चार तास कसून चौकशी केली. या तिघांकडे करण्यात आलेल्या चौकशीतील नव्या माहितीच्या आधारे एनसीबी अभिनेत्रींकडे चौकशी करणार आहे.

एनसीबीने गुरुवारी क्षितिज रवीप्रसाद याला या चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले आहे. तर, विशेष अमली पदार्थ विरोधी न्यायालयाने दिलेल्या परवानगीवरुन तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोवीक आणि दिपेश सावंत यांचे नव्याने जबाब नोंदविले आहेत.

करण जोहरच्या पार्टीमधला तो व्हिडीओ तपासणीसाठी लॅबमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेला करण जोहरच्या घरातील कथित ड्रग्स पार्टीचा व्ह़िडीओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. आता एफएसएल या व्हिडीओची पडताळणी करणार आहे. या पार्टीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासह विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि रणबीर कपूर, तसेच अन्य कलाकार दिसले होते. त्यामुळे आता या व्हिडीओची नव्याने पडताळणी होणार आहे.

Back to top button