सलमान खानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम | पुढारी

सलमान खानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सलमान खानचा आवाज म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांना ओळखले जायचे. सलमान खानच्या चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यासारखी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली होती. 

४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले बालसुब्रमण्यम यांना सहा वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने आणि आंध्र प्रदेश सरकारकडून २५ वेळा तेलुगु चित्रपटांतील योगदानासाठी नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

वाचा – प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

दरम्यान, बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर असताना सलमान खानने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ट्विट करून प्रार्थना केली होती. सलमान खानने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिलं होतं, बालसुब्रह्मण्यम सर हृदयापासून मनोकामना करतो की आपण लवकर ठिक होवो. माझ्यासाठी प्रत्येक गाणे गाण्यासाठी आपले खूप खूप आभार, ज्या गाण्यांनी मला यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं. आपल्याला खूप-खूप प्रेम. 

एसपी बालासुब्रमण्यम यांनी १६ भारतीय भाषेतील जवळपास ४० हजारहून अधिक गाणी गायली आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि अन्य भाषांमध्ये एकापेक्षा हिट गाणी त्यांच्या नावावर आहेत.  त्यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

सलमानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम

सलमान खानची सर्वोत्कृष्ट गाण्यांना बालसुब्रमण्यम यांनी आपला स्वरसाज चढवला होता. मैने प्यार किया सलमान खानच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील गाणे दिल दिवाना बिन सजना के माने ना..खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाबरोबर एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाने पुढे सलमानचे करिअर बहरले. 

Back to top button