Me Too वर 'शक्तीमान'चे बेताल वक्तव्य, 'आता म्हणतात तो मी नव्हेच'! | पुढारी

Me Too वर 'शक्तीमान'चे बेताल वक्तव्य, 'आता म्हणतात तो मी नव्हेच'!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शक्तीमान अर्थातच अभिनेता मुकेश खन्ना यांनी मी टू वरून महिलांवर टीका केली होती. ‘हा मी टूचा प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला, जेव्हा महिला घराबाहेर पडून काम करू लागल्या.’ या वक्तव्यानंतर मुकेश सोशल मीडियावर ट्रोल झाले. मुकेश यांच्या ‘मी टू’वर मांडलेले मत यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश म्हणत आहेत की, “स्त्रियांचे काम आहे घर सांभाळणे, ‘मी टू’चा प्रॉब्लेम कोठून सुरू झाला, जेव्हा महिलांनीही बाहेर काम करणं सुरू केलं. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात.”

महिलांवर अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या मुकेश यांना नेटकऱ्यांनी निशाण्यावर धरले. सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त करत ट्रोल करण्यास सुरुवात केले. 

ट्रोलिंगनंतर मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘मला खरंच आश्चर्य वाटत आहे की, माझ्या एका स्टेटमेंटला खूप चुकीच्या पध्दतीने घेतले गेले आहे. मी महिलांविरोधात बोलत आहे, असे म्हटले जात आहे. मी स्त्रियांचा खूप आदर करतो. यासाठी मी ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाचा विरोध केला. मी महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहे. अत्याचाराविरोधात मी नेहमीच बोलत असतो. माझ्या एका मुलाखतीचा व्हिडिओ क्लिपिंगवरून लोकांनी गोंधळ घातला आहे.’

वाचा – ड्रग्ज प्रकरणानंतर सारा अली खान पुन्हा चर्चेत  

‘त्या’ एका व्यक्तीमुळे आज बॉलिवूडचा ‘बादशाह’ आहे शाहरुख!

ते पुढे म्हणतात की, ‘मी कधीच म्हणालो नाही की, महिलांनी काम करू नये. मला केवळ हे सांगायचं आहे की, मीटूची सुरुवात कशी होते. आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान मिळवले आहे. ते डिफेन्स मिनिस्टर असो, फायनान्स मिनिस्टर असो, परराष्ट्र मंत्री असो वा स्पेसमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांनी आपले स्थान बळकट केले आहे. तर मी महिलांच्या काम करण्याविरोधात कसा असू शकेन. मी असं म्हटलं नाही की, महिला बाहेर जातात, तेव्हा मीटू होतं. मी एका वर्षापूर्वी या टॉपिकवर व्हिडिओ बनवला होता. जे मी लोकांना दाखवू इच्छितो की, तेव्हादेखील मी हेच म्हणालो होतो, महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित कसे राहायला हवे. मी तेव्हादेखील म्हटलं नव्हतं की, महिलांनी कामावर जाऊ नये. तर आज कसं म्हणू शकतो. मी सर्व मित्रांना हे सांगू इच्छितो की, माझ्या स्टेटमेंटला चुकीच्या पध्दतीने घेऊ नये. माझी मागील चाळीस वर्षे, माझा चित्रपट प्रवास या गोष्टीची पुष्टी करतो की, मी नेहमी महिलांचा आदर केला आहे. जर कुठल्याही स्त्रीला माझ्या या स्टेटमेंटने दु:ख पोहोचले असेल तर मला खंत आहे की, मी माझे मत योग्यपणे मांडू शकलो नाही.’

Back to top button