हनिमूनसाठी गोव्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल | पुढारी

हनिमूनसाठी गोव्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

हनिमूनसाठी गोव्यात आलेल्या आणि नंतर पतीने मारहाण केली म्हणून पतीच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केलेल्या एका प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्रीचा गोव्यात चित्रित केलेला अत्यंत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. सदर व्हिडिओ काणकोण तालुक्यातील जलस्रोत खात्याच्या बंधार्‍यावर चित्रीत झाला असून जलस्रोत खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी याप्रकरणी काणकोण पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.

सविस्तर माहिती माहितीनुसार, सदर मॉडेल यापूर्वी अनेक वादग्रस्त व्हिडिओमुळे गाजलेली आहे. गेल्या महिन्यात तिचा मुंबईत एका व्यावसायिकाशी विवाह झाला होता आणि हनिमूनसाठी ती काणकोण तालुक्यातील एका हॉटेलमध्ये उतरली होती. याच दरम्यान आपल्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि आपला विनयभंग केला अशी तक्रार तिने पोलिस स्थानकात नोंद केली होती. या प्रकरणाच्या एका महिन्यानंतर नुकतेच सोशल मीडियावर त्या अभिनेत्रीचा अत्यंत अश्लील स्वरूपाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सदर व्हिडिओ काणकोणमधील एका लहान धरणावर चित्रीत झालेला आहे. यात बंधार्‍यावरील पंप हाऊसचा चित्रीकरणासाठी वापर झालेला आहे. या मादक स्वरूपाच्या व्हिडिओत तिने नग्नतेचे दर्शन केले असून सध्या या व्हिडिओमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून या व्हिडिओवरून सरकार आणि गोवा मनोरंजन संस्थेवर टीका केली आहे. पोलिसांनी ताबडतोब याची दखल घेऊन कारवाई न केल्यास महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेस पक्षाला परत एकदा रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. गोवा मनोरंजन संस्थेने सदर चित्रीकरणासाठी कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले की, या व्हिडिओप्रकरणी तक्रार नोंद झाली असून चौकशी सुरू करण्यात आलेली आहेे. 

 

Back to top button