वाढदिनी मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो

पणजी : पुढारी वृत्तसेवा
फिटनेस, लव्ह लाइफ आणि बोल्ड फोटोशुटमुळे चर्चेत असणारे अभिनेते मिलिंद सोमण यांनी समुद्रकिनार्यावर नग्नावस्थेत धावतानाचा स्वतःचा फोटो शेअर केला आहे. सोमण यांनी आपला 55 वा वाढदिवस समुद्रकिनार्यावर नग्नावस्थेत पळून साजरा केला. बॉलीवूड अभिनेत्री तथा मॉडेल पूनम पांडे यांचा पॉर्न व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाल्यानंतर बुधवारी हा नवा प्रकार समोर आला. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठविली.
मिलिंदने वाढदिनी स्वतःच स्वतःला इस्टाग्रामवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सोबत एक फोटोही अपलोड केला. तो नग्न धावत असल्याचा हा फोटो आहे. मात्र, हा फोटो गोव्यातील असल्याच्या घटनेला गोवा पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
या फोटोवरून भाजपवर निशाणा साधून, सरकार गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन म्हणून प्रोत्साहन देत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. या अश्लिल आणि आक्षेपार्ह गोष्टींना कोण प्रोत्साहन देत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गोवा सरकार, भाजप, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही चोडणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये टॅग केले असून यात कुठेच पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांचे नाव घेतलेले नाही. पॉर्न माफियाला पाठिंबा कोण देत आहे, असा प्रश्न विचारत गोवा सरकारवर चोडणकर यांनी टीका केली आहे.