पूनम पांडेने गोव्यातील 'तो' अश्लिल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून हटवला

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिने पोस्ट केलेल्या अश्लिल व्हिडिओवर राज्यभरातून टीकेची झोड उठविल्यानंतर, अखेर तिने तो हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटविला. राज्यातील महिला संघटनांबरोबर, राजकीय पक्ष तसेच जलस्त्रोत खात्याने या व्हिडिओ विरोधात आवाज उठवून तो चित्रित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
हनिमूनसाठी पती सॅम बॉम्बे याच्यासोबत पूनम पांडे गेल्या महिन्यात काणकोण येथील एका हॉटेलात उतरली होती. यावेळी तिने आपल्याच पतीविरोधात मारहाण आणि विनयभंगाची तक्रार काणकोण पोलिसात दिली होती. हा व्हिडिओ तिच्या याच दौर्याच्या वेळी चित्रीत झाल्याचा अंदाज आहे. काणकोणच्या चापोली धरणावर चित्रित केलेल्या या व्हिडिओवरून राज्यात वादाला तोंड फुटले आहे. प्रदेश काँग्रेसने या व्हिडिओवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. गोवा फॉरवर्डने मुख्यमंत्री आणि जलस्त्रोत खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे.
सध्या काणकोण पोलिसांनी या व्हिडिओ विषयी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून याची चौकशी सुरू असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.