निर्माता नाडियादवालाच्या घरावर ‘एनसीबी’चे छापे | पुढारी

निर्माता नाडियादवालाच्या घरावर ‘एनसीबी’चे छापे

मुंबई : पुढारी डेस्क

बॉलीवूड निर्माता फिरोज नाडियादवाला याच्या मुंबईतील घरावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापे टाकले. या छाप्यात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कारवाईवेळी नाडियादवाला घरी नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईबरोबरच मुंबईत आणखी 6 ठिकाणी छापे टाकले. या ठिकाणीही ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची ‘एनसीबी’च्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. दरम्यान, अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नाडियादवालाची पत्नी शबाना सईद हिला अटक करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ‘एनसीबी’ने मुंबईत तळ ठोकला आहे. याप्रकरणी सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी केली होती. त्यानंतर बॉलीवूडशी संबंधित असलेल्या अनेक ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली होती. काही जणांना गोव्यातूनही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात ‘एनसीबी’च्या काही अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण पथकच क्वारंटाईन झाले होते. सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर ‘एनसीबी’ने पुन्हा आपली कारवाई सुरू केली.फिरोज नाडियादवाला याच्या घरी कारवाई करताना त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. नाडियादवाला बाहेर असल्याने त्याची चौकशी नंतर करण्यात येणार आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या काही संशयितांनी नाडियादवालाचे नाव घेतल्यानंतर त्याच्या घरावर छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने नाडियादवालासह त्याच्या पत्नीला आधी नोटीस जारी केली होती. मात्र, नाडियादवाला चौकशीसाठी हजर झाला नाही. त्याच्या पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.अमली पदार्थांच्या कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांना याआधीच अटक करण्यात आली होती. यापैकी दीपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीला जामिनावर सोडण्यात आले. रिया जवळपास महिनाभर भायखळा कारागृहात होती.

‘एनसीबी’च्या पथकाने वर्सोवा, गोरेगाव आणि नवी मुंबईच्या कोपरखैरणे, खारघर येथील कारवाईत 6 किलो ड्रग्ज (मारिज्युआना आणि एमडी) जप्त केले, तर मालाड, अंधेरी या ठिकाणीही छापे टाकून काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.

अभिनेता अर्जुन रामपाल याच्या आफ्रिकन मैत्रिणीचा भाऊ अ‍ॅगिसियालोस दिमित्रीयस याला अमली पदार्थाच्या पुरवठ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. धर्मा प्रॉडक्शनचा क्षितिज प्रसाद हादेखील अटकेत आहे. हे दोघे मुंबईत कोकेनचा पुरवठा करणार्‍या ओमेगा गॉडवीन या नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात होते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गॉडवीननेच या दोघांची नावे ‘एनसीबी’च्या चौकशीत उघड केली होती.

Back to top button