70 हजार झाडांच्या कत्तलीमागे तत्त्वज्ञान काय? : रणदीप हुडा | पुढारी

70 हजार झाडांच्या कत्तलीमागे तत्त्वज्ञान काय? : रणदीप हुडा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मोले अभयारण्यातून जाणार्‍या तीन विकास प्रकल्पांना विरोध करणार्‍या ‘मोले वाचवा’ संघटनेला अभिनेते रणदीप हुडा यांनी पाठिंबा दिला आहे. वाघांचा अधिवास असलेल्या मोले जंगलातील 70 हजार झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा नाश करण्यामागे काय तत्त्वज्ञान आहे, अशी विचारणा हुडा यांनी ट्विटरवर केली आहे. 

गोव्यातील आंदोलनात पहिल्यांदाच एखाद्या हिंदी चित्रपट अभिनेत्याने थेट प्रतिक्रिया व्यक्‍त करून आंदोलकांना पाठिंबा देताना गोमंतकीयांच्या या जनआंदोलनाला अन्य लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. 

हुडा यांनी ट्विटरवर आपले मत मांडताना म्हटले आहे, की गोव्यात कोळसा हब बनवण्यासाठी रेल्वे दुपदरीकरणाचे काम हाती घेतले जात आहे. पर्यावरणद‍ृष्ट्या या संवेदनशील भागात प्रवेश करण्याऐवजी तो परिसर डावलून बाजूने विकासकाम करणे अधिक चांगले झाले असते.

याआधी, आसाम, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याच्या सरकारने जैवविविधता वाचवण्यासाठी मोठे विकास प्रकल्प बंद केले आहेत. असे गोवा सरकारला करता येणार नाही का, असा सवाल करताना हुडा यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही अशा विचारशून्य विस्तार प्रकल्पांना विरोध केला असल्याची आठवण केली आहे. राज्यातील एमपीटी बंदरातून 2035 सालापर्यंत कोळसा वाहतूक होण्याची शक्यता असून तेवढ्या कोळसातून झालेली हानी ही कायमची समस्या बनणार असल्याची टीका हुडा यांनी केली आहे. 

Back to top button