दिशा सालियन आत्महत्याप्रकरण होणार ‘बंद’ | पुढारी

दिशा सालियन आत्महत्याप्रकरण होणार ‘बंद’

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा

जून महिन्यात मालाड येथे दिशा सतीश सालियन हिच्या कथित आत्महत्येचा तपास मालवणी पोलिसांनी पूर्ण केला आहे. पोलिसांचा रिपोर्ट लवकरच एसीपी दिलीप यादव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे ही केस आता बंद होणार आहे. याला मालवणी पोलिसांकडून दुजोरा दिला. मात्र, अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. 

8 जूनच्या मध्यरात्री दिशा ही मालवणीतील जनकल्याण नगर, गॅलेक्सी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडली होती. हा प्रकार नंतर तिचा प्रियकर रोहन रॉय व इतर चार मित्र दिप अजमेरा, इंद्रनील वैद्य, रिशा पडवळ आणि हिमांशू शिखरे यांना समजला होता, त्यानंतर त्यांनी तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले होते. दिशाच्या आत्महत्येबाबत कोणीही संशय अथवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली. 

मात्र सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दिशासंदर्भात अनेक आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित झाले होते. त्याचा सालियन कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे सालियन कुटुंबियांनी मालवणी पोलिसांसह सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वृत्त देणार्‍या सोशल मिडीया आणि प्रसारमाध्यमांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. 

या घटनेला 5 महिने उलटले असून चौकशीत दिशाने आत्महत्या केली असावी किंवा तिचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला असावा असे उघडकीस आले आहे. तिची हत्या झाल्याचे तसेच तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. वैद्यकीय, फॉन्सिक लॅबकडून प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये तिच्यावर लैगिंक अत्याचार किंवा तिची हत्या झाल्याचे नमूद नाही. 

घटनेच्या वेळेस दिशाने मद्यप्राशन केले होते. तिच्या हातातून काही महत्त्वाचे प्रोजेक्ट निघून गेले होते, याबाबत तिने तिच्या प्रियकराला सांगितले होते, तेव्हापासून ते तणावात होती, आपल्या करिअरबाबत तिला चिंता वाटत होती. सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत तिचे जवळचे संबंध नव्हते, केवळ कामानिमित्त ते दोघेही एक-दोनदा भेटले होते.

 

Back to top button