अभिनेता अर्जुन रामपालची सात तास कसून चौकशी  | पुढारी

अभिनेता अर्जुन रामपालची सात तास कसून चौकशी 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट आणि सेवनाचा पर्दाफाश करत असलेल्या केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल याच्याकडे शुक्रवारी सात तास कसून चौकशी केली. दरम्यान, एनसीबीने अर्जुनचा खास मित्र पॉल ग्रियाड यालाही अटक केली. गुरुवारी पॉलची चौकशी करण्यात आली होती.

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने सोमवारी अर्जुन रामपाल याच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर छापा टाकला होता. या छाप्यात अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या तपासात त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्‍त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. या धाडीत भारतात विकण्यास बंदी असलेले काही टॅबलेट  सापडले होते. अर्जुनकडे त्याबाबत चौकशी केल्याचे सांगण्यात येते.त्यानंतर अर्जुनला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यानुसार अर्जुन शुक्रवारी सकाळी एनसीबीसमोर हजर झाला. दरम्यान, अटक झालेला अर्जुनचा खास मित्र पॉल हा ऑस्ट्रेलियन असून  तो आर्किटेक्ट आहे. अर्जुन रामपालची ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरू असतानाच या प्रकरणात त्याच्या मित्राला अटक करण्यात आल्याने त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियडस्ला अटक करण्यात आली. 

Back to top button