रितेशने आईच्या साडीपासून बनवून घेतला ड्रेस, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

रितेशने आईच्या साडीपासून बनवून घेतला ड्रेस, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दिवाळी म्हटलं की, आनंद, उत्साह आणि जल्लोष. दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघणाऱ्या या मंगलमयी वातावरणात सर्वजण स्वत:ला दिव्यांप्रमाणे उजळण्याचा प्रयत्न करीत असतो. सर्वजण दिवाळीची मोठी जोरदार तयारी करीत असतात. मोठी खरेदी, कपडे, फराळ असा सगळा बेत ठरलेलाच. त्यात सर्वजण अधिक उत्साही आणि सजग असतात ते आपल्या नव्या कपड्यांसाठी. दिवाळीच्या खास मोक्यावर आपला पेहराव अधिक उठावदार होण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. त्यामध्ये सेलिब्रेटींची बात काही औरच. पण, यंदाच्या दिवाळीत मात्र अभिनेत्या रितेश देशमुख याने अनोखा पेहराव केला आहे. त्याने स्वत:च्या मुलांसाठी आणि स्वत:साठी विशेष कपडे शिवले असून त्याचा व्हिडिओ त्याने सोशल माध्यमांवर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून या माध्यमातून रितेशने चांगला संदेश ही दिला आहे.

तसे पहायला गेले तर अभिनेता रितेश देशमुख कशाचीच काही कमतरता नाही. राजकीय घराण्याचा वारसा आणि स्वत: एक उत्तम अभिनेता कदाचित तो स्वत:ची कपडेही फॉरेन वरुनच खरेदी करत असावा. त्यात दिवाळी म्हटलं की मग काय एखाद्या बॉलिवूडमधील खास डिझायनरकडून कपडे तयार करता आले असते. परंतु, रितेशने तसे न करता आपल्या आईच्या जुन्या साडीपासून स्वत:ला आणि स्वत:च्या दोन्ही मुलांसाठी कुर्ता शिवून घेतला आहे. या निमित्ताने त्याने ‘जुनं ते सोनं’ या म्हणीला सत्यात उतरवत आईच्या मायेची झालरच या कपड्याद्वारे त्याने स्वत:वर ओढावून घेतली. स्वत: ला व मुलांना दिवाळीनिमित्त नवे कपडे झाले आणि त्याने अशा अनोख्या कृतीतून इतरांनाही जुन्या मायेच्या गोष्टी पुन्हा आपल्या जीवनात कशा ताज्या करता येतील याचा एक संदेश सुद्धा न कळत का होईना देऊन गेला. 

फक्त आईच्या जुन्या साडी पासून बनविलेला कुर्ता परिधान करुन थांबणारा तो रितेश कसला. त्याने याचा व्हिडिओ लगेच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर ही केला. त्याच सोबत त्याने आपल्या आईचा ही त्यांची जुनी साडी दाखवतानाचा एक व्हिडिओ देखिल शेअर केला. जुन्या साडीचा तयार केलेला रितेचा नवा ड्रेस सध्या खूपच व्हायल होत आहे. ‘आईची जुनी साडी आणि मुलांसाठी नवे कपडे… हॅप्पी दिवाळी’ असे कॅप्शन लिहून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत हा व्हिडिओ अभिनेत्री जेनेलिया व रितेशची पत्नी हीने शूट केला आहे.     

Back to top button