दुबईत साजरा होणार 'गल्फ सिने फेस्ट २०२१'  | पुढारी

दुबईत साजरा होणार 'गल्फ सिने फेस्ट २०२१' 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चंदेरी दुनियेचा झगमगाट विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळत असतो. मात्र, कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील या झगमगाटाचे वलय काहीसे कमी झाले आहे. मनोरंजनाचा वसा घेत प्रेक्षकांना सातत्याने काहीतरी नवं देऊ पाहणाऱ्या कलाकारांनी नाउमेद न होता नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या.

हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये २० ते २३ जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रिमीयर सोहळा रंगणार आहे.

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून यात बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये २०२१ या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. उत्तम आशय विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.

Back to top button