अभिनेते मोहन जोशी, ज्योती जोशी यांना यशवंत-वेणू पुरस्कार | पुढारी

अभिनेते मोहन जोशी, ज्योती जोशी यांना यशवंत-वेणू पुरस्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह वर्धापनदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने देण्यात येणारा यशवंत-वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि.25) सायंकाळी 5.30 वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे, अशी माहिती सुनील महाजन यांनी दिली.

पाच हजार रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते प्रशांत दामले आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात पुण्यात कोरोना काळात विशेष कामगिरी करणार्‍या माधुरी गायकवाड (परिचारिका), सागर निकम (सफाई कामगार), विलास अडागळे (कर्मचारी, वैकुंठ स्मशानभूमी), धनंजय पुरकर (कलाकारांना मदत करणारे) यांचा खास कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या कालावधीनंतर 25 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करून नाट्य व्यवसायाचे पुनश्‍च हरिओम करण्याकरिता शासनाच्या नियमांना धरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सुनील महाजन यांनी सांगितले.

Back to top button