माझ्यावर विषप्रयोग झाला होता, पण ‘त्या’विरोधात पुरावा नव्हता : लता मंगेशकर | पुढारी

माझ्यावर विषप्रयोग झाला होता, पण ‘त्या’विरोधात पुरावा नव्हता : लता मंगेशकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर 58 वर्षांपूर्वी विषप्रयोग झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द लतादीदींनीच उघड केली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’ या वेबसाईटला लतादीदींनी माहिती दिली आहे. 1963 साली आपल्यावर कुणी विषप्रयोग केला, याची माहिती होती. मात्र, पुरावा नसल्याचेही लतादीदींनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लतादीदींवर विषप्रयोग करणारी व्यक्ती कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी आपल्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे  जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून रहावे लागले. आपण पुन्हा  गाऊ शकणार नाही अशाही अफवा पसरल्या.  डॉ. आर.पी. कपूर यांनी  या आजारातून बरे केले. भविष्यात चालू शकेन की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला होता. आपल्यावर विषप्रयोग कोणी केला ते  कळले होते, पण आपल्याकडे त्याविरोधात पुरावा नव्हता, असेही त्या म्हणाल्या. 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, 1962 साली  लतादीदींचे ‘बीस साल बाद’ सिनेमातील एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु रेकॉर्डिंग करण्याच्या काही तास आधी त्यांची तब्येत अचानक बिघडली. जवळपास तीन दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना जेवणातून विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगितले होते. 

या घटनेनंतर बहीण उषा मंगेशकर यांनी स्वत: स्वयंपाक करण्याचे ठरवले. दरम्यान, त्यांचा स्वयंपाकी अचानक गायब झाला होता. 1963 मधील त्या काळात गाण्यासाठी लतादीदींना दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर हा विषप्रयोग झाला होता. पण संकटातून बाहेर येण्याची त्यांची जिद्द आणि योग्य वैद्यकीय उपचारांनी त्या बर्‍या झाल्या. या घटनेनंतर त्यांनी ‘बीस साल बाद’ या सिनेमातील ‘कही दिप जले कहीं दिल’ हे गाणे गायले.

या अफवेला दिला पूर्णविराम

विषप्रयोगाच्या प्रकरणाबद्दल आम्ही मंगेशकर फारसे बोलत नसल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, तो काळ एकूण कुटुंबासाठी फारच वाईट होता.  त्या प्रकरणानंतर आपण आवाज गमावला नाही.

Back to top button