फ्रेंडशिप मध्ये कधी मिळालं प्रेम तर कधी... - पुढारी

फ्रेंडशिप मध्ये कधी मिळालं प्रेम तर कधी...

पुढारी ऑनलाईन डेस्क

हिंदी चित्रपटांनी आज तमाम रूढी-प्रथांना छेद दिला आहे. येणाऱ्या काळाचा प्रवाह पाहता नव्या प्रेक्षकांना काय वाटतं, त्यांना काय हवंय याकडे अधिक लक्ष देण्यात आलं. आणि त्याप्रकारचे चित्रपट बनवण्यात आले.

चित्रपटांचे विषय, भाषा, पात्र, सादरीकरण सर्व पातळीवर बदलता समाज आणि प्रेमाचे विविध पैलू प्रतिबिंबीत करणारे चित्रपट तयार झाले. यामुळेचं असे चित्रपट पाहणारा एक नवा प्रेक्षक वर्ग तयार झाला.

भारतीय चित्रपटांमुळे समाजात प्रेमाची परिभाषाही बदलली आणि प्रेक्षकांनी ती स्वीकारलीदेखील! अशा बदललेल्या काही चित्रपटांची निर्मिती झाली, ज्यांनी समाजाची ठराविक घालून दिलेली चाकोरी मोडीत काढली.

वेकअप सीड, दिल चाहता है, लव्ह सेक्स और धोका, इंग्लिश-विंग्लिश, मसान, पिकू, अलिगढ, बधाई हो, सर यासारख्या चित्रपटांनी प्रेमाच्या सौंदर्याचं वेगळ्या प्रकारे सादरीकरण केलं.

अनेक चित्रपटांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमा-सौंदर्यशास्त्राचा विकास घडवून आणला. मानवी भावना काळानुरुप बदलत राहिल्या आहेत. परिस्थितीनुसार, प्रेम हे समाजातील चांगलं किंवा वाईट घटनांसाठी एक शक्तिशाली घटक ठरला आहे.

अधिक वाचा – 

अयान मुखर्जी (वेक अप सीड), फरहान अख्तर (दिल चाहता है), दिबाकर बॅनर्जी (लव्ह सेक्स और धोका), गौरी शिंदे (इंग्लिश-विंग्लिश), नीरज घेवन (मसान), अमित शर्मा (बधाई हो), Rohena Gera (सर), जीयो बेबी (द ग्रेट इंडियन किचन) यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी लेखकांच्या कल्पना, कथांना कागदावरून मोठ्या पडद्यावर सहजपणे उतरवलं.

बदलत्या काळासोबत, भारतीय समाजाची प्रेमाप्रती असलेली धारणा, त्याचे परिणाम आणि चित्रणदेखील बदललं. आणि ते हिंदी सिनेमांच्या माध्यमातून प्रतीत झालं.

प्रेम अमर्त्य आहे. ते मनामनातून वाढत राहतं. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे काही घडतं, त्याचं प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून दिसत असतं.

कधीकधी ते मसानप्रमाणे क्रूर शोकांतिका किंवा पिकूप्रमाणे आनंद व्यक्त करत असतं. त्या-त्या काळाचं प्रतिबिंब त्या-त्या काळाच्या चित्रपटांमध्ये उमटत गेलं.

कधी-कधी चित्रपटातील प्रेमाचा संघर्ष, प्रणयविषयक कल्पना आणि वेगवेगळा दृष्टीकोण व्यापक होत गेला. पण, प्रेमाचा शेवट नेहमीच सुखद होईल, असे नाही.

या ८ चित्रपटांनी २१ व्या शतकातील प्रेमाचा दृष्टीकोणच बदलला…

दिल चाहता है

फरहान अख्तरचा आयकॉनिक चित्रपट समीर (सैफ अली खान), सिद्धार्थ (अक्षय खन्ना) व आकाश (आमिर खान) च्या भोवती फिरतो. या तिघांना प्रेमाचा खरा अर्थ कळतो.

या सिनेमाने एका वेगळ्या स्क्रिनप्लेचं उदाहरण प्रेक्षकांसमोर ठेवलं. एरवी, फक्त प्रेम हे कथानक मांडणारा सिनेमा दिल चाहता हैच्या निमित्ताने बदलला. या सिनेमात लव्ह, मॅच्युरेशन आणि फॉरबिडन लव्ह या प्लॉटची मांडणी केली.

कॅमेरा, कथानक आणि अभिनयाच्या दृष्टीने सकस असणाऱ्या या सिनेमाने प्रेमाची एक नवी व्याख्या प्रेमाची नवी व्याख्या भारतीय प्रेक्षकांसमोर ठेवली.

समीर खूप रोमँटिक असतो. पण, तो कुठल्याही मुलीकडे आकर्षित झाला की त्याला वाटतं, त्याचं खरं प्रेम मिळालं आहे. दुसरीकडे, चित्रकार असलेल्या सिद्धार्थ प्रेमात पडलेला नसतो. तो आपल्या कामाच्या प्रती खूप गंभीर आणि समर्पित असतो.

तर आकाश हा शालिनी (प्रीती जिंटा) नावाच्या मुलीवर प्रेम करतो. पण, तिचा आधीचं कुणाशी तरी साखरपुडा झालेला असतो.

पुढे सिद्धार्थ त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि घटस्फोटीत तारा (डिंपल कपाडिया) च्या प्रेमात पडतो. पण, तो आपल्या भावनांना दाबून ठेवतो. कारण, त्याला माहित असतं की, समाजातील लोक या संबंधांना घृणास्पद मानतात.

पुढे तारा मरते. नंतर सिद्धार्थ गोव्यात एका सुंदर मुलीला भेटतो. तो सुंदर स्माईल देतो, याचा अर्थ आहे की, आता तो तारामध्ये अडकून राहिलेला नाही. सिद्धार्थने भूतकाळ मागे टाकून आपली पावले पुढे टाकली आहेत.

सर 

रोहेना गेरा (Rohena Gera) यांच्या सर या चित्रपटात प्रेम हे असंख्य अडथळ्यांनी भरलेले आहे. प्रेमासाठी वर्ग, शिक्षणाच्या भिंती नेहमी अडथळे बनून समोर येतात. पण, तरीदेखील एकमेकांप्रती आदर, प्रोत्साहन यांच्या माध्यमातून प्रेम दर्शवण्यात आलं आहे.

लव्ह, सेक्स और धोका (एलएसडी)

दिवाकर बॅनर्जीचा लव्ह, सेक्स और धोका हा चित्रपट प्रेम, ऑनर किलींग, एमएमएस घोटाळे आणि स्टिंग ऑपरेशन्स या गोष्टींची मांडणी करतो. एलएसडीने प्रेमाची ‘ती’ गडद बाजू किंवा प्रेमाच्या नावावर केलेली प्रत्येक गोष्ट दाखवली. तात्पुरतं असलेलं प्रेम शेवटी एक अनैतिक व्यक्तीच्या हातात पडून ‘तिच्या’ शोषणाचं साधन बनतं. सौंदर्य, धाडसी प्रणय आणि अखेरीस प्रेमात मिळालेली फसवणूक हे प्रेयसीच्या मृत्यूचं कारण बनतं.

मसान

नीरज घेवन दिग्दर्शित मसान हा चित्रपट बनारसमधील दोन वेगवेगळ्या कथांनी मिळून बनला आहे. पहिली कथा देवीची आहे. ती आपल्या पार्टनरसोबत एका हॉटेलमध्ये जाते.

तेथे पोलिस छापा टाकतात आणि त्यांना ताब्यात घेतात. त्यानंतर तिचा पार्टनर आत्महत्या करतो. देवीकडून पोलिस जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेतात. आणि ही गोष्ट लपवण्यासाठी पैसे मागतात.

दुसरी कहाणी स्मशानभूमीत काम करणाऱ्या दीपक (विक्की कौशल) ची आहे. तो तथाकथित समाजव्यवस्थेनुसार खालच्या जातीचा आहे. एक दिवस त्याची भेट एका उच्चवर्णीय मुलगी शालू गुप्ता (श्वेता त्रिपाठी) शी होते. दोघांना एकमेकांवर प्रेम होतं. परंतु, ते वेगवेगळ्या जातीचे असतात.

चित्रपटाच्या एका सीनमध्ये दिग्दर्शकाने धक्कातंत्राचा वापर केला आहे. आपल्याचं प्रेयसीचं प्रेत प्रियकर तिच्या बोटातील अंगठीवरून ओळखतो आणि तिथेच धाडकन कोसळतो. दोन जातीतला संघर्ष होण्याआधीचं चित्रपटातील प्रियकराला अपघातात आपली प्रेयसी गमवावी लागते.

वेक अप सिड

अयान मुखर्जीच्या वेक अप सिडमध्ये, प्रेम हा प्रगल्भ असण्याचा एक टप्पा आहे. अशी मांडणी करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रेम हे केवळ आकर्षण नाही. आयेशाच्या मते ती एक जबाबदारी आहे. आयेशा ही सिडची मैत्रीण असून ती सिडपेक्षा वयाने मोठी असते.

आयशाचा (कोंकणा सेन) स्वाभिमान सांगतो की, सिड (रणबीर कपूर) ने आता मॅच्युअर्ड व्हायला हवं. ती एका मॅच्युअर्ड पार्टनरच्या शोधात आहे. सिड-आयेशा एकत्र राहू लागतात. दोघांचे विचार, आवडीनिवडी एकदम वेगळ्या आहेत. पण, तरीही दोघे एकत्र राहू शकतात, हे चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न झाला.

द ग्रेट इंडियन किचन

जीयो बेबी हा चित्रपट खूप सुंदररित्या भारतीय कुटुंबातील पितृसत्ताक पध्दतीला दर्शवतं. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे महिलांच्या रोजच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असणारा चित्रपट होय.

नात्यानात्यात प्रेम आहे. पण, ती घरात रोज राबराबते; हे डोळ्यांनी पाहून देखील गप्प बसणारे मंडळी याचं घरात असतात. पतीच्या प्रत्येक गोष्टी, मागण्या तिला पूर्ण करायच्या असतात. पण, ती आपलं सासर, आपलं कुटुंब म्हणून नि:स्वार्थपणे तितकचं प्रेम करते. या प्रेमाची तुलना कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही.

इंग्लिश-विंग्लिश

शशी गोडबोले (श्रीदेवी) एक भारतीय गृहिणी असते. ती छोटी व्यावसायिक आहे. तिला इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा पती सतीश आणि मुलगी सपना तिची खिल्ली उडवतात. तिचा नेहमी अपमान करतात. तराही ती आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करत असते.

शशी वेळोवेळी नकारात्मक विचार आणि असुरक्षितता अनुभवते. जेव्हा ती इंग्रजी शिकण्याचा क्लास लावते. दरम्यान, एका अन्य अभिनेत्याचं प्रेम ती नाकारते. कारण, ती तिच्या पतीवर खूप प्रेम करते. एका भाषणात ती आपण विवाहित असल्याचं सांगत आपल्या कुटुंबाचे कौतुक करताना दिसते.

बधाई हो

आजी होण्याच्या वयात एक महिला (नीना गुप्ता) म्हणजेच बधाई हो या चित्रपटातील अभिनेता आयुष्मान खुराना (नकुल) ची माता ही आई बनते.

नीना गुप्ता आणि गजराज राव कशाप्रकारे आपल्या कुटुंबासमोर या प्रेग्नेंसीचे रहस्य उघड करतात. समाजाकडून या गोष्टीच्या रिॲक्शन्स काय येतात? नकुलची आजी (सुरेखा सिक्री) आपल्या सुनेला (नीना गुप्ता) कशाप्रकारे समजून घेतात? याची मांडणी सिनेमात उत्तम प्रकारे झाली आहे.

‘बधाई हो’मधील प्रसंग विनोद, हाणामारी, पती-पत्नीमधील थोडे भांडण आणि त्यांच्यातील रोमान्स सौंदर्यात भर घालतात. अर्थात प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकतं, नाही का?

  • संकलन – स्वालिया शिकलगार 

 

Back to top button