पुढारी ऑनलाईन डेस्क
रशियन अभिनेत्री (Russian Actress) लेसन करीमोवा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग आहे. भारतात राहून तिने अनेक बिग बजेट चित्रपट, जाहिराती, मॉडेलिंग आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. लेसन करीमोवा छोट्या पडद्यावरील मालिका 'साथ निभाना साथिया २' मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. (Russian Actress) मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, लेसनने खुलासा केला की, तिला मुंबईत घर शोधण्यात खूप अडचणी येत आहेत. तिने सांगितले की, रशियन असल्यामुळे भाड्याने घर मिळणे खूप कठीण झाले आहे.
वास्तविक मुंबईत अपार्टमेंट शोधणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. जर तुम्ही अभिनया क्षेत्राशी संबंधित असाल तर मुंबईत घर मिळणे आणखी कठीण होऊन बसते. लेसनला घर शोधण्यात नाहक त्रास झाला. कारण ती केवळ अभिनेत्रीच नाही तर विदेशीही आहे. त्यामुळे हाऊसिंग सोसायटीत चांगलं घर मिळणं हे खूप अवघड झालं होतं.
ती म्हणते की, मुंबईत घर मिळणे खूप अवघड आहे. भारतीय कलाकारांपेक्षा विदेशी कलाकारांसाठी घर शोधणे अवघड असते. आमच्यासाठी हा संघर्ष वाढतो. कारण इथल्या लोकांची मानसिकता अजूनही २० व्या शतकातील आहे. मला माहित नाही की, इथले लोक विदेशी लोकांबद्दल काय विचार करतात. पण आम्ही देखील सामान्य लोक आहोत आणि आम्हाला अपार्टमेंट भाड्याने दिल्याने त्रास होणार नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही किंवा काही चुकीचे करत नाही.
ती म्हणते-लोक तुम्हाला तुमच्या त्वचेचा रंग, तुमच्या देशाच्या नावावरून ठरवतात. मी विदेशी आहे किंवा मी अभिनेत्री आहे म्हणून लोक मला घर देत नाहीत तेव्हा खूप त्रास होतो. हे २१ वे शतक आहे, इथे सगळे समान आहेत.