गणपतराव देशमुख : लोकनायकाला अखेरचा सलाम | पुढारी

गणपतराव देशमुख : लोकनायकाला अखेरचा सलाम

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : डाव्या चळवळीचे अध्वर्यू व माजी मंत्री, शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज, सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (वय 94) यांच्यावर सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांना ‘अखेरचा सलाम’ करण्यासाठी जनसागर उसळला होता. त्यांच्या जाण्याने आठ दशकांहून अधिक काळ जनसेवेचा ध्यास असलेला व्रतस्थ समाजसेवी हरपल्याची भावना व्यक्त होत होती. त्यांच्या निधनाने सांगोला शहर कडकडीत बंद होते.

माजी आमदार देशमुख यांनी शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या गणपतरावांनी विधानसभेवर एकाच सांगोला मतदारसंघातून सर्वाधिक 11 वेळा निवडून येत 54 वर्षे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी सांगोला तालुक्यातील दुष्काळ पुसण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेतीच्या पाण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजना मार्गी लावली तर पिण्याच्या पाण्यासाठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 81 गावांची पाणी पुरवठा योजना मार्गी लावली होती. त्यांनी आयुष्यभर जनतेच्या वकिलीसाठी आयुष्य वेचले. अशा व्रतस्थ समाजकारण्याने शुक्रवारी जगाचा निरोप घेतला.

आज सकाळी त्यांचे पार्थिव पेन्नूर (ता. मोहोळ) यांच्या मूळ गावी नेण्यात आले. त्यानंतर तेथून पुन्हा सांगोल्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांची सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली.

दुपारी 12.30 वाजता त्यांच्या घरी पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता.

‘भाई गणपतराव देशमुख अमर रहे, च्या घोषणा देण्यात येत होत्या. उपस्थित जनसमुदाय सासृ नयनांनी अखेरचा निरोप देत होते. या भावपूर्ण वातावरणात आसमंतही गहिवरून आला होता.

पावसाच्या हलक्या सरी देखील जणू अश्रू ढाळत उपस्थित होत्या. गणपतराव देशमुख यांची दुपारी 12.45 ला घरापासून सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.

1.45 वाजता सूतगिरणी वर पोहचला. तेथे दिड तास त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सूतगिरणी कार्यस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यांचे ज्येष्ठ चिरंजीव पोपटराव देशमुख यांनी चितेला भडाग्नी दिला.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. जयंत पाटील, आ. शहाजी बापू पाटील,आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान अवताडे, आ. सचिन कल्यानशेट्टी, मा. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, महादेव जानकर, कल्याणराव काळे, सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे आदींसह जि. प. सदस्य, प. स. सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Back to top button